चिपळूण / राजेश जाधव :
शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने यावर्षीही बाप्पांचा प्रवास खड्ड्यामधून होणार आहे. सर्वच रस्ते खराब असल्याने खड्डे भरताना नगर परिषद व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रयत्न तोकडे पडत असून त्यांच्या नाकी दम आला आहे. असे असताना या रस्त्यांचे करोडो रुपये घेतलेले ठेकेदार मात्र या परिस्थितीशी आपला काहीही संबंध नसल्याच्या अविर्भावात आहेत. त्यांना अधिकारीही पाठीशी घालत असल्याने याचा त्रास नागरिकांसह वाहनचालकांना होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून लाखो, करोडो रुपये खर्च करुन तयार केले जाणारे रस्ते बोगस केले जात आहेत. नगर परिषद तर रस्त्यांसाठी मोठा खर्च करीत आहे. मात्र त्याचा ठेकेदार वगळता कोणालाही तितकासा फायदा होताना दिसत नाही. वर्षाच्या आतच रस्ते उखडत असून जागोजागी खड्डे पडत आहेत. हिच परिस्थिती ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातील करोडो रुपयांचे रस्ते तयार करताना संबधित विभागाचे अधिकारी कामाच्या ठिकाणी हजरच राहत नसल्याने ठेकेदार मनमानी करत रस्ते तयार करताना दिसतात. याचा परिणाम पहिल्याच पावसात दिसून येतो. विशेष म्हणजे या रस्त्यांची तीन वर्षे वॉरंटी असतानाही नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते संबधित ठेकेदारांकडून कामे करुन घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
- दोन थर गेले वाहून
गेल्या दोन वर्षांचा विचार करता तालुक्यात तितकासा पाऊस पडलेला नाही. तरीही शहरातील सर्वच तर ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्णपणे खराब झाले आहे. त्यांच्यावरील पहिले दोन थर वाहून गेले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यावरुन कामाचा दर्जा स्पष्ट होत आहे. यावर्षी तर खड्ड्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे काही दिवसांनी येणाऱ्या गणपती बाप्पांचा प्रवास याच मोठमोठ्या खड्ड्यांमधूनच होणार आहे. त्यामुळे भक्तांसह वाहनचालकांमध्ये नाराजी पसरली आहे. हे खड्डे भरण्यासाठी खडी, नदीतील गाळ याचा वापर केला जात असल्याने त्यावरुन वाहने घसरत आहेत. त्यामुळे नाराजीत आणखीनच भर पडताना दिसत आहे.
- गणेशमूर्ती नेताना होणार कसरत
शहरासह ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय असल्याने त्यावरुन वाहने चालवताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच चार दिवसांपूर्वी मिरजोळी-साखरवाडी येथे दोन वाहने खड्ड्यांमध्ये अडकली होती. तसेच वाहने कलंडल्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत वाहनातून गणेशमूर्ती नेताना मोठी कसरत करावी लागणार आहे. यासाठी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
- अंगावर पाणी, खडे उडण्याचे प्रकार
पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. काही वाहनचालक याचा विचार न करता खड्यांमधून वेगाने वाहने चालवत असल्याने विद्यार्थी, नागरिकांच्या अंगावर घाणेरडे पाणी उडत आहे. यामुळे नाराजी असतानाच दुसरीकडे खडी, नदीतील गाळाने भरले जाणारे खड्डे काही वेळातच उखडत आहेत. त्यामुळे पसरणारी खडी व दगड वाहनांच्या टायरमुळे उडून अनेकांना लागत आहेत. तसेच शहरात काही दुकानांमध्ये उडताना दिसत असून हाही त्रास सहन करावा लागत आहे.
- नागरिकांचा त्रास कमी करा
शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवापर्यंत टिकायला हवे असतील तर ते जांभा व ग्रीटने भरण्याची गरज आहे. पाऊस थांबताच संबधित विभागांनी डांबराने खड्डे भरुन नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद भागवत यांनी दिली.
- अधिकारी म्हणतात..
लवकरच कामाला सुरुवात
ग्रामीण भागातील जे रस्ते आमच्या अखत्यारित आहेत. त्यावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
– श्याम खुणेकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, चिपळूण
- योग्य पद्धतीने खड्डे
भरणार शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात अडचणी येऊ नयेत म्हणून खड्डे भरण्याचे नियोजन करण्यात आले असून कामाला पद्धतीने खड्डे भरले जातील. सुरुवातही झाली आहे. सणापूर्वी योग्य
– विशाल भोसले, मुख्याधिकारी नगर परिषद, चिपळूण








