‘शरीरम् आद्यम खलु धर्मसाधनम्’ असे एक प्राचीन संस्कृत धर्मतत्व आहे. आपण आपल्या शरीराची निगा प्रथम व्यवस्थित राखली पाहिजे, असा याचा अर्थ आहे. त्यामुळे शरीराची प्रथम किरकोळ वाटणारी तक्रार असली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करु नये. कारण अशी तक्रार ही प्रकृतीअस्वास्थ्याच्या हिमनगाचे केवळ टोक असू शकते. तसे पाहिल्यास आज लोक पूर्वीपेक्षा अधिक आरोग्यसजग झाले आहेत. सजगतेचा लाभ कसा होतो, हे फ्रान्समधील एका घटनेवरुन स्पष्ट होते.
या देशातील एका 56 वर्षीय व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने त्याने डॉक्टरांना प्रकृती दाखविली. डॉक्टरांनाही ते किरकोळ लक्षण वाटले आणि त्यांनी त्याला सीटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. या स्कॅनिंगचा अहवाल पाहून डॉक्टरांचीही क्षणभर भंबेरी उडाली. कारण या व्यक्तीचे हृदय आणि फुप्फुस यांच्यात एक सिमेंटचा मोठा तुकडा आढळून आला. छातीत सिंमेट कसे आले, याचा तपास करण्यात आला. या व्यक्तीची काही दिवसांपूर्वी ‘कायफोप्लास्टी’ नामक शस्त्रक्रिया झाली होती. त्या शस्त्रक्रियेच्या वेळी चुकून हा तुकडा त्याच्या शरिरात घुसला होता, असे समजून आले. ही शस्त्रक्रिया पाठीच्या कण्याची झीज झाल्यास केली जाते. झिजलेल्या भागात एक विशेष प्रकारचे सिमेंट भरले जाते. याच सिमेंटचा एक तुकडा ही शस्त्रक्रिया करताना शरीरात राहून गेला होता. तो काही दिवसांमध्ये हृदय आणि फुप्फुस यांच्या मधल्या भागापर्यंत आला होता. आता या रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पण या शस्त्रक्रियेत धोका असा आहे की, ती करत असताना या सिमेंटच्या तुकड्याचा एक कण निसटून मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत जाऊ शकतो. तसे झाल्यास रुग्णाची स्थिती गंभीर होऊ शकते. तरीही डॉक्टरांनी धोका पत्करुन ही शस्त्रक्रिया यशस्वी केली आणि या रुग्णाला चीवनदान दिले. कायकोप्लास्टी ही शस्त्रक्रिया तशी नवी नाही. तथापि, सिमेंटचा तुकडा रुग्णाच्या हृदयापर्यंत पोहचणे ही क्वचित घडणारी घटना आहे. या रुग्णाने त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला म्हणून त्याचा जीव वाचू शकला. आणखी काही दिवस त्याने दुखणे अंगावर काढले असते, तर स्थिती अधिक गंभीर बनली असती. म्हणूनच प्रकृतीकडे सूक्ष्म लक्ष देणे योग्य असते.









