जैन मुनी हत्याप्रकरणात पोलिसांची तत्परता : खबऱ्या म्हणून वावरणाराच निघाला खुनी, सात दिवसांच्या चौकशीत काय झाले उघड?
बेळगाव : हिरेकोडी, ता. चिकोडी येथील नंदीपर्वत आश्रमाचे संस्थापक आचार्य 108 कामकुमार मुनी महाराज (वय 58) यांच्या हत्येप्रकरणी चिकोडी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा जणांची तब्बल सात दिवस कसून चौकशी झाली आहे. सोमवार दि. 17 जुलै रोजी त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात येणार आहे. तपासात नेमके काय निष्पन्न झाले? अहिंसा परमो धर्मची शिकवण देणाऱ्या मुनी महाराजांची हत्या अत्यंत निर्दयीपणे कोणत्या कारणासाठी करण्यात आली? आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलीस अधिकारी झटत आहेत. नारायण माळी (वय 32) मूळचा रा. कटकभावी, ता. रायबाग, सध्या रा. हिरेकोडी व त्याचा साथीदार हसन दलायत (वय 30) रा. चिकोडी या दोघा जणांची चौकशी करण्यात येत आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिकोडीचे दक्ष पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार, पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील आदी अधिकारी आरोपींची चौकशी करीत आहेत. याच अधिकाऱ्यांनी खुनानंतर केवळ एक-दोन दिवसात प्रकरणाचा छडा लावला होता. त्यामुळेच देशभरात बेळगाव पोलिसांची पत राखली गेली.
जैन मुनींच्या हत्येवरून सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजपने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यासाठी बेळगाव पोलीस पुरेसे आहेत. सीबीआयकडे सोपविण्याची गरज नाही, अशी भूमिका मांडली आहे. स्वत: गृहमंत्र्यांनी हिरेकोडीला भेट देऊन हत्येनंतरच्या परिस्थितीची पाहणी केली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
बुधवार दि. 5 जुलैच्या रात्रीपासून मुनी महाराज बेपत्ता झाले होते. दुसऱ्या दिवशी शोध घेऊन आश्रमवासियांनी चिकोडी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवार दि. 7 जुलै रोजी मुनी महाराज बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. त्याच दिवशी रात्री पोलिसांनी नारायण व हसन यांना ताब्यात घेतले. महाराजांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 8 जुलै रोजी तब्बल दहा तासांहून अधिक काळ मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. नारायण माळी हा वाळू पुरवठा करणारा ठेकेदार आहे. हसन हा त्याच्या टिप्परवर चालक होता. सध्या त्याने नोकरी सोडली असली तरी दोघांमध्ये मैत्री कायम होती. प्राथमिक माहितीनुसार आर्थिक व्यवहारातून नारायणने टॉवेलने गळा आवळून मुनींची हत्या केली आहे. त्यांना इलेक्ट्रिक शॉकही दिला आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हसनची मदत घेतली. पोत्यात बांधून मोटारसायकलवरून मृतदेह नारायणने कटकभावी या आपल्या गावी नेला.









