दुर्जनदूषितमनसां सुजनेपि नास्ति विश्वास: ।
दुग्धेन दग्धवदनो तक्रं फूत्कृत्य मानव: पिबति ।।
अर्थ: दुर्जनांकडून (फसवणूक झाल्यामुळे) ज्याचे मन दुषित (कलुषित) झाले आहे अशा माणसाचा सज्जनावरही विश्वास बसत नाही. गरम दुधामुळे तोंड पोळलेला माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.
असाच एक प्रसंग रामायणामध्ये घडलेला दिसतो. अयोध्येमध्ये रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच मागितलेल्या वरदानामुळे रामाला 14 वर्षांचा वनवास होतो आणि भरताला राज्य दिलं जातं. या सगळ्या प्रसंगानंतर घरात अनेक प्रचंड प्रकारच्या घडामोडी घडल्या. तरी राम तटस्थ असतो आणि वनात जायला निघतो. त्याच्याबरोबर अर्थातच पतिव्रता असलेली सीतादेखील निघते आणि रामाची सावली असलेला लक्ष्मणदेखील निघतो. या तिघांना सोडायला जेव्हा सुमंत्र आपल्या रथामधून निघतो. त्यावेळेला अयोध्येची वेस ओलांडून पुढे शृंगवेरपूर पर्यंत येतात. तिथे आल्यानंतर रथाला विश्र्रांती देऊन दुसऱ्या दिवशी राम सुमंत्राला परत जायला सांगतो. सुमंत्राच्या मनात अजिबात परत जाण्याची इच्छा नसते. रामाच्या जवळ राहावं ही सगळ्यांचीच इच्छा असते. रथाचे घोडेसुद्धा परत जायला त्रास देतात. या घटनेनंतर तिथे शृंगवेरपूरचा राजा गुहा रामाच्या भेटीला येतो. रामाला स्वत:चं राज्यदेखील देतो पण मुळातच वडिलांची वचनपूर्ती करण्यासाठी निघालेले श्रीराम या सगळ्याला नकार देतात आणि त्याच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करतो. हे सगळं घडल्यानंतर आता गंगा नदी पार करून दक्षिणेकडे निघायचं असा विचार करत असलेले राम एखादा नावाडी मिळतोय का? आपल्याला होडीतून तिकडे घेऊन जातोय का? याचा विचार करत असतात. त्याचवेळी तिकडे एक लांब नावाडी उभा असतो. त्याला जवळ बोलवतात पण हा नावाडी नकार देतो, मी तुम्हाला नेऊ शकणार नाही. अनेक प्रश्न विचारल्यानंतर हा नावाडी उत्तर देतो की तुमच्याबद्दल मी बऱ्याच लोकांकडून ऐकले आहे. तुम्हाला दैवी शक्ती प्राप्त आहेत म्हणून. तुमचा पाय लागल्यानंतर एका दगडातून एक अहिल्या नावाची स्त्री प्रकट झाली होती, तुम्ही जर माझ्या होडीत बसलात आणि माझ्या होडीचे तुम्ही काहीतरी वेगळंच केलंत तर? माझ्यासारख्या गरिबांनी रोजचं जगणं कसं करावं? माझी मुलं बाळा उपाशी मरतील. मुळातच परिस्थितीने आणि नशिबाने गांजलेला हा माणूस प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक करत होता. ताकसुद्धा फुंकून पीत होता. याचं कारणच त्याच्या पूर्व जन्मामध्ये होतं. जो रामाच्या लक्षात आला. पूर्वजांनी हा नावाडी वैकुंठा आपल्या समुद्रामध्ये कासवाच्या रूपात राहात होता आणि त्याला विष्णूच दर्शन हवं होतं. विष्णू शेषायेवर असताना हा कासव डोक्मयाच्या बाजूने गेला तर शेषनाग त्याला हाकलून द्यायचा आणि पायाच्या बाजूने गेला तर लक्ष्मी देवी त्याला हाकलून द्यायच्या. असं शंभर वर्षाचं आयुष्य जगलेला हा कासव शेवटी मृत्यू पावला आणि पुढे अनेक जन्मानंतर या राम जन्माच्यावेळी नावाड्याच्या रूपात तिथे आलेला होता. शेवटी रामाने त्याला सांगितलं की तू माझे पाय धू आणि मग तुला त्याच्यात काही बदल नाही वाटला किंवा काही झालं तरच मग आम्ही होडीत बसतो. ही गोष्ट नावाड्याला पटली. कारण परिस्थितीने गांजलेला माणूस प्रत्येक गोष्ट अतिशय जपून करत असतो. त्याचं हे उत्तम उदाहरण आणि रामाचे पाय धुतल्यानंतर त्याची जन्मोजन्मीची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्याच्या हृदयामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा आनंद निर्माण झाला होता. रामाचे पाय धुतल्यानंतर ते सर्व पाणी तीर्थ म्हणून ह्या नावाड्याने पिऊन टाकलं आणि मग त्यांना होडीमध्ये बसवलं. आपल्या आयुष्यातसुद्धा अशी अनेक देव माणसे आपल्यासमोर येत असतात पण मुळातच आपण परिस्थितीने गांजलेले असल्यामुळे आपण प्रत्येकाला ताकसुद्धा फुंकून प्यावं या रीतीनेच त्याला पारखत असतो.








