मतमोजणी परिसरात तुफान गर्दी, वाहतूक कोंडीची समस्या
प्रतिनिधी/ बेळगाव
हुरहुर, उत्सुकता आणि वाढती चिंता अशी परिस्थिती शनिवारी सकाळपासून आरपीडी चौक परिसरातील मतमोजणी केंद्राबाहेर होती. आपल्या नेत्याला नेमकी किती मते पडतात? याबाबतची उत्सुकता कार्यकर्त्यांना होती. मताधिक्य वाढले की जल्लोष वाढत होता आणि कमी झाले की चिंता व्यक्त केली जात होती. उमेदवारांसाठी दिल्या जाणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून जात होता. विजय निश्चित झाला की गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी, असे चित्र दिवसभरात पहायला मिळाले.
शनिवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडली. बेळगाव जिल्ह्याची आरपीडी कॉलेज येथे मतमोजणी झाली. मतमोजणीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरपीडी रोडवरील एका बाजूचा रोड खुला तर दुसऱ्या बाजूच्या रोडवर कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी 7 वाजल्यापासून याठिकाणी कार्यकर्ते दाखल होत होते. जसजसे निकाल बाहेर पडू लागले तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.
बेळगाव तालुक्यापेक्षा रायबाग, अथणी, चिकोडी, हुक्केरी येथून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या परिसरात दाखल झाले होते. गोवावेस येथे वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आल्याने सोमवार पेठ, मंगळवार पेठ या परिसरात वाहने लावून कार्यकर्ते आरपीडी चौक परिसरात येत होते. यामुळे सकाळच्या सत्रात काहीकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. निकाल समाजमाध्यमांमुळे काही क्षणात मोबाईलवर उपलब्ध होत असल्यामुळे म्हणावी तितकी कार्यकर्त्यांची गर्दी झाली नव्हती. परंतु, कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह मात्र शिगेला पोहोचला होता.
सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी 9 वाजल्यानंतर कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच काही उमेदवार आघाडीवर असल्याने त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करीत होते. सकाळी 10 वाजल्यानंतर मात्र हळूहळू गर्दी वाढू लागली. पहिल्या रेल्वेगेटपासून आरपीडीपर्यंतच्या सर्व रस्त्यांवर कार्यकर्ते दिसून येत होते. हातामध्ये पक्षाचे झेंडे, डोक्यावर टोप्या व गळ्यामध्ये शाली घालून हे कार्यकर्ते जल्लोष करीत होते. दुपारी 1 पर्यंत सर्वच निकाल स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांची गर्दी हळूहळू कमी होऊ लागली.

रखरखत्या उन्हातही अमाप उत्साह
सकाळी 10 नंतर उन्हाचा तडाखा वाढू लागला. तरीदेखील कार्यकर्त्यांचा उत्साह मात्र कमी झाला नाही. रखरखत्या उन्हातही आरपीडी चौक येथे हातामध्ये झेंडे घेऊन कार्यकर्ते नाचत होते. काहींनी आसपासच्या दुकानांच्या पायऱ्यांवर विसावा घेतला. परंतु, अनेक कार्यकर्ते उन्हामध्ये उभे राहून आपल्या पक्षाचा तसेच आपल्या नेत्याचा जयजयकार करीत होते. दुपारी 3 वाजेपर्यंत हा माहौल तसाच होता. कितीही ऊन लागले तरी आपल्या नेत्यासमोर ते कमी आहे, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करीत होते.
लक्ष्मण सवदी यांची ग्रँड एंट्री!
अथणी मतदारसंघाचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी मोठी आघाडी घेतल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. प्रतिस्पर्धी असणाऱ्या महेश कुमठहळ्ळी यांच्यापेक्षा मोठ्या मताधिक्याने त्यांनी आघाडी घेतली. भाजपमधून काँग्रेसमध्ये जात ही कामगिरी त्यांनी केल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. त्यातच लक्ष्मण सवदी यांची आरपीडी परिसरात एंट्री झाल्याने हलगीच्या तालावर जल्लोष करत गुलाल उधळत त्यांचे स्वागत करण्यात आले. काहीकाळ गाडीतून हात दाखवून आपणच अथणीचे किंग आहोत, हे सवदी यांनी दाखवून दिले.
गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी
आरपीडी चौक परिसरात कार्यकर्त्यांना उभे राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. सकाळपासूनच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा याठिकाणी जल्लोष सुरू होता. राज्यात काँग्रेसची सत्ता येणार, हे चित्र स्पष्ट होऊ लागल्याने झेंडे घेऊन नाचणारे कार्यकर्ते दिसून आले. गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तुतारी तसेच हलगीच्या तालावर कार्यकर्ते आपापल्या नेत्यांचे स्वागत करीत होते.
तंत्रज्ञानामुळे काहीक्षणात निकाल मोबाईलवर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून प्रत्येक फेरीनंतर उमेदवाराचे मताधिक्य दर्शविण्यात येत होते. यामुळे काहीक्षणातच समाजमाध्यमांवर निकाल उपलब्ध होत होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणे निकाल ऐकण्यासाठी होणारी तुफान गर्दी यावेळी दिसून आली नाही. प्रत्येक उमेदवाराचे काही मोजकेच कार्यकर्ते याठिकाणी दिसून आले. निकाल जाहीर झाल्यानंतर काहीक्षणातच नागरिकांच्या मोबाईलवर उपलब्ध होत होता.
काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष
राज्यात काँग्रेसची सत्ता येणार, हे निवडणुकीपूर्वीच एक्झिट पोलमधून स्पष्ट झाले होते. शनिवारी सकाळपासून निकाल जसे बाहेर येऊ लागले तसे काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. विशेषत: जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते मतमोजणी परिसरात दाखल झाले होते. त्या मानाने भाजपचे कार्यकर्ते तुरळक होते. सकाळी 11 नंतर राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिसू लागल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता.

चोख पोलीस बंदोबस्त
मतमोजणी परिसरात कोणताही अनुचित प्रकार अथवा वादावादीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यकर्त्यांना मतमोजणी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला. विजयी उमेदवार आरपीडी चौक परिसरात आल्यानंतरच त्यांना जल्लोष करण्यास मुभा दिली जात होती. तसेच आसपासच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सीसीटीव्ही तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात आले होते. दंगल प्रतिबंधक वाहने तैनात केली होती. यामध्ये पाण्याचा फवारा करणारी आणि अश्रुधुराच्या नळकांड्या सोडणारी वज्र वाहने होती.









