तहसीलदार कार्यालयातील प्रकार : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नागरिकांना त्रास
बेळगाव : तहसीलदार कार्यालयात दररोज नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हे कार्यालय नेहमी गजबजलेले असते. मात्र मागील काही दिवसांपासून हे कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील समस्यांचा डोंगर वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील 15 दिवसांपासून उन पडले आहे. मात्र या कार्यालयात पाण्याचे तळे साचले आहे. तेव्हा येथील गळती तातडीने थांबवावी, अशी मागणी होत आहे. बेळगाव तहसीलदार कार्यालयात असा प्रकार घडला आहे. उन्हामध्येही कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर तलावाचे स्वरुप निर्माण झाले आहे. यामधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पाणी साचल्याने येथे डासांचा प्रादुर्भावही वाढत आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. चक्क तहसीलदारांनाही याच पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील सुधारणा कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात तर या कार्यालयात पाऊल ठेवणेही कठीण होते. सर्वत्र पाणी साचून राहते. परिणामी याचा फटका सर्वसामान्यांना बसतोच. शिवाय कार्यालयात हजर करणाऱ्या नागरिकांनाही सहन करावा लागतो. सध्या कार्यालयात पाणी साचत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. संपूर्ण इमारतीत असा प्रकार सुरू आहे. वरच्या इमारतीवर पाणी थांबून राहत असल्याने ही गळती लागली आहे. मात्र अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी किमान वरील छतावर पत्रे तरी बसवावेत, अशी मागणी होत आहे.









