राकसकोपचे अतिरिक्त पाणी सोडले नदीत : परिसरातील भातशेतीला फटका
बेळगाव : सतत कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी मार्कंडेय नदी पात्राबाहेर पडली आहे. ऑक्टोबर महिन्यात नदी पात्राबाहेर आल्याने शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. मागील 15 दिवसांत परतीचा जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, जलाशयांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. विशेषत: राकसकोप जलाशयाचा एक दरवाजा खुला केला आहे. शिवाय अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडले आहे. त्यामुळे काही ठिकाणी मार्कंडेयचे पाणी पात्राबाहेर आलेआहे. यंदा जूनपासूनच समाधानकारक पावसाने हजेरी लावली आहे. शिवाय ऑक्टोबरमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. नदी, नाल्याच्या काठी असलेली भातपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे भातपीक कुजून मोठा फटका बसण्याची चिंता व्यक्त होत आहे.
राकसकोप पाणलोट क्षेत्रातही अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत विसर्ग केले जात आहे. परिणामी मार्कंडेयच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी बाहेर पडले आहे. मार्कंडेय नदीला जुलै-ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसात पूर आला होता. दरम्यान नदीकाठावरील भात शेतीला फटका बसला होता. पुन्हा आता नदीकाठावर पाणी आल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच दररोज कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने शिवारात पाणीचपाणी होऊ लागले आहे. भात पोसवले आहे. तर काही ठिकाणी भात कापणीलाही येऊ लागले आहे. मात्र दररोज कोसळत असलेल्या पावसामुळे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.









