अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, इंद्रियांना जबरदस्तीनं गप्प बसवून मनुष्य विषयांपासून फार काळ दूर राहू शकत नाही. म्हणून विषयोपभोग घ्यायचाच नाही असा निर्धार न करता साधकाने मर्यादित प्रमाणात विषय उपभोगावेत म्हणजे त्याची कुतरओढ होणार नाही. अशा पद्धतीने वागत असताना हळूहळू संत मंडळी सांगतात त्याप्रमाणे विषयातून मिळणारा आनंद अल्पकाळ टिकणारा असून तो संपला की, दु:खच वाट्याला येते हे लक्षात येऊ लागते. असे झाले की तो आपोआपच विषयांपासून दूर होत जाऊन आत्मज्ञानप्राप्तीच्या निकट जात राहतो. त्याला जेव्हा आत्मज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याने संपूर्णत: इंद्रियजय साधलेला असतो. आत्मज्ञानाशिवाय इंद्रियजय साधला जात नाही हे समजल्यावर साधक कदाचित निराश होण्याची शक्यता आहे कारण आत्मज्ञान प्राप्त होणे ही किती दुरापास्त गोष्ट आहे हे तो जाणून असतो आणि ते मिळेस्तोवर विषय आपल्याला सोडणार नाहीत ही जाणीव त्याला अस्वस्थ करत असते. धड साधनाही नाही आणि धड विषयांच्या उपभोगाचा आनंदही नाही अशा विलक्षण द्विधा मन:स्थितीत तो असतो. त्याला आता पुढे काय करावे म्हणजे विषयांच्या तावडीतून आपली सुटका होईल हेच समजत नसते. म्हणून इंद्रियजय साधण्यासाठी दुसरी आणि लगेच अंमलात आणता येईल अशी युक्ती सांगतो. माणसाने वाट्याला आलेली कर्मे निरपेक्षतेनं करायला सुरवात करावी. ह्यात अडचण अशी येते की, वाट्याला आलेलं काम सर्वांच्या आवडीचं असतंच असं नाही. तरीही वाट्याला आलंय ना मग करायचं तेही निरपेक्षतेनं हे तत्व लक्षात ठेव. तू म्हणशील वाट्याला आलेलं कर्म मला आवडत नाही मग मी ते का करायचं? तर त्याचं कारण मी पुढील श्लोकात सांगतो.
अकर्मण श्रेष्ठतमं कर्मानीहाकृतं तु यत् ।
वर्ष्मण स्थितिरप्यस्याकर्मणो नैव सेत्स्यति ।।7।।
अर्थ- कर्म आवडत नाही म्हणून त्याचा त्याग करण्यापेक्षा अनिच्छेने का होईना वाट्याला आलेलं कर्म करणे अत्यंत श्रेष्ठ होय कारण कुणी कर्मत्याग करून राहीन असे म्हंटले तर त्याच्या देहाच्या हालचालीसुद्धा एक कर्मच असल्याने त्याला त्यासुद्धा बंद ठेवाव्या लागतील. याचाच अर्थ असा की, मनुष्य कर्मावांचून राहणेच शक्य नाही. विवरण-वाट्याला आलेलं कर्म जर नावडतं असेल तर ते टाळण्याकडं माणसाचा कल असतो पण असं कधी करू नये. असा कर्मत्याग म्हणजे आपल्या सोयीनं केलेला कर्माचा त्याग होय. अमुक एक काम करू नये असं मला वाटतंय म्हणून नाही करत असं काही वेळा मनुष्य करतो. त्यामुळे त्याच्या आळसात वाढ होते. आळशी मनुष्यात तमोगुण जास्त प्रमाणात असतो. तामसी माणूस इतर कुणाला न जुमानता मी करतोय तेच बरोबर असं म्हणत असतो. हट्टी स्वभावामुळे त्याच्या हातून कर्मयोगाची साधना होणे शक्य नसते. त्यामुळे त्याने केलेल्या कर्मत्यागातून काहीच साध्य होत नाही आणि दुसरं म्हणजे संपूर्ण कर्मत्याग करणं तर कुणालाच शक्य नाही. कारण असं ठरवलं तर शरीराच्या तो रोज करत असलेल्या हालचालीही होऊ शकणार नाहीत कारण रोजची जी शारीरिक कर्मे उदाहरणार्थ बोलणे, चालणे, श्वास घेणे, इत्यादि सर्व कर्मे शारीरिक कर्मात सामील असतात. इतकंच काय पापणी लववणे हेही शारीरिक कर्म होय. म्हणून कर्मत्याग म्हणजे या सर्वाचा त्याग करावा लागेल. असं केलं तर आयुष्यच थांबवल्यासारखं होईल आणि हे सर्वस्वी अशक्य आहे. म्हणून कर्मत्याग करण्याच्या भानगडीत न पडता वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेनं करावं हे सगळ्यात उत्तम. त्यानं कर्मयोग साधला जातो. कर्मयोगात निरपेक्ष कर्म करण्यावर भर असल्याने त्यातून पापपुण्याचा कर्मबंध निर्माण होत नाही. म्हणजेच जिवंतपणीच मनुष्य कर्मबंधातून मुक्त झाल्यामुळे मोक्षस्थिती अनुभवू शकतो. राजा ही केवढी मोठी संधी आहे हे लक्षात घे.
क्रमश:








