तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय : कर्नाटक सरकारकडून व्यापाऱ्यांवर दडपशाही
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांकडून सीमाप्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला जात आहे. दि. 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूक सायकलफेरी काढली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून या फेरीला प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात आहे असे असले तरी सायकलफेरी काढणारच, असा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा मंदिरात झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. राजाभाऊ पाटील होते. सचिव एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले व्यासपीठावर उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून प्रत्येक वर्षी काळ्यादिनी मूक सायकल फेरीचे नियोजन केले जाते. मध्यवर्तीच्या निर्देशानुसार खानापूर, बेळगाव, निपाणी येथील घटक समितींकडून याची कार्यवाही केली जाते. जिल्हा प्रशासनाकडून मूक सायकल फेरीला परवानगी देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी समितीकडून परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाही दिली तरी काळादिन गांभीर्याने पाळला जाणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कर्नाटक सरकारकडून व्यापाऱ्यांवर वेगवेगळ्या मार्गाने दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. शहरात असणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवरील नामफलकांवर कार्यवाही केली जात आहे. कन्नड भाषेमधूनच फलक लिहिण्यासाठी दबाव आणला जात आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात लढा देण्यासाठी रुपरेषा आखली पाहिजे. तसेच तालुक्यातील 16 पेक्षा अधिक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी वेगवेगळ्या कामासाठी संपादित केल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातही न्यायालयीन लढा तीव्रपणे राबविण्याची गरज असल्याची माहिती एम. जी. पाटील यांनी दिली.
सीमाप्रश्न सोडवणूक ही चळवळ
प्रत्येक वर्षी काळादिन गांभीर्याने पाळला जातो. ही लढाई सुरूच असून नेत्यांनी आता न्यायालयीन लढाईकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना या लढ्याकडे लक्ष वेधण्यासाठी भाग पाडले पाहिजे. केंद्र सरकारवर दबाव घालून सीमाप्रश्नाचा निकाल लावला पाहिजे, असे शिवाजी शिंदे यांनी सांगितले. सीमाप्रश्न सोडवणूक ही एक चळवळ आहे. या लढ्यासाठी अनेकांनी मोठे योगदान दिले आहे. यापूर्वी सीमाभागातून अनेक आमदार निवडून येत होते. मात्र, सध्या निवडणुकीची संकल्पना बदलली आहे. त्यामुळे समितीचे उमेदवार निवडून येणे कठीण झाले आहे, असे असले तरी ही चळवळ आहे. या चळवळीतून आपल्याला न्याय मिळणार असा विश्वास आहे, असे आर. के. पाटील यांनी सांगितले. यावेळी माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, शिवाजी सुंठकर, लक्ष्मण होनगेकर आदी उपस्थित होते.
काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा युवा समितीचा निर्धार
बेळगावसह 856 गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली. याचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. बुधवार दि. 1 रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या आदेशानुसार काळा दिन गांभीर्याने पाळून मूक सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी केले. म. ए. युवा समितीची व्यापक बैठक रविवारी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर होते. या बैठकीत व्यापाऱ्यांवर करण्यात आलेल्या कन्नड सक्तीचा निषेध करण्यात आला. तसेच सीमालढा सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपाध्यक्ष वासू सामजी, सिद्धाप्पा चौगुले, खजिनदार विनायक कावळे, इंद्रजित धामणेकरसह इतर उपस्थित होते.









