मॅपवरून हटविले विषारी शहर
जगातील अनेक ठिकाणे विविध कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं स्वतःच्या सौंदर्यामुळे तर काही इतिहासामुळे ओळखली जातात. परंतु एक ठिकाण पूर्णपणे निर्जन आहे. प्रशासनाने 31 ऑगस्टपर्यंत हे शहर पूर्णपणे रिकामी करविले आहे. हे ठिकाण आता माणसांसाठी सुरक्षित नसल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. हे शहर आता कायमस्वरुपी निर्जन ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विट्टेनुमला मायनिंग टाउन या नावाने ओळखले जाते. परंतु आता या शहराला ऑस्ट्रेलियाचे चेर्नोबिल म्हटले जाऊ लागले आहे. या शहरातील हवा इतकी विषारी झाली आहे की येथे श्वास घेणेही अवघड ठरले होते. येथे श्वास घेतल्यास जीव जाण्याचा धोका निर्माण झाला होता. याचमुळे या शहरातील सर्व रहिवाशांना बाहेर काढत हे शहर पूर्णपणे बंद करविण्यात आले आहे. या शहराला आता नकाशावरून हटविण्याची तयारी देखील जवळपास पूर्ण झाली आहे.

हजारो लोकांचे होते वास्तवय
विट्टेनुम क्लोजर ऍक्टनुसार लोकांना 31 ऑगस्टपर्यंत शहर रिकामी करण्याची मुदत देण्यात आली होती. हे शहर स्वतःहून सोडावे किंवा त्यांना बळजबरीने बाहेर काढले जाईल असे लोकांना सांगण्यात आले होते. या शहरात 1943 पासून अनेक कुटुंबे स्थायिक झाली होती. मायनिंग क्षेत्र असल्याने येथे अनेक प्रकारच्या विषारी वायूंची गळती व्हायची. याचमुळे हळूहळू अनेक लोकांना जीव गमवावा लागला. 1966 मध्ये नुकसान आणि आरोग्याच्या कारणांमुळे विट्टेनुम खण बंद करण्यात आली. येथे खाणकामावर बंदी घालण्यात आली आहे.
हजारो जणांचा मृत्यू
तरीही लोकांनी हे शहर रिकामी केले नव्हते. याचमुळे येथे राहणाऱया सुमारे 2 हजार जणांनी स्वतःचा जीव गमावला. म्हणजेच येथे राहणाऱया प्रत्येक 10 जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अध्ययनानुसार खाणीत काम करणाऱया जवळपास प्रत्येक कामगाराचा मृत्यू झाला आहे. 2006 साली ऑस्ट्रेलियाच्या सरकारने विट्टेनुमचा शहराचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. 2007 मध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. आता 31 ऑगस्ट रोजी या शहरात राहणाऱया अखेरच्या व्यक्तीने अन्यत्र स्थलांतर केले आहे.









