पाटण्यातील बैठक हे फक्त फोटोसेशन : अमित शहांचा हल्लाबोल
2024 मध्ये भाजपला 300 हून अधिक जागा , मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील हे निश्चित
वृत्तसंस्था/ जम्मू
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाटणा येथे झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाटण्यात झालेली बैठक हे केवळ फोटोसशन असून 2024 मध्ये मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार असल्याचा दावा त्यांनी केला. जम्मूमध्ये अनेक प्रकल्पांच्या शिलान्यासप्रसंगी अमित शहा यांनी विरोधी पक्षांच्या ऐक्मयाबाबतही वक्तव्य केले. विरोधकांनी एकजुटीने कितीही प्रयत्न केले तरी 2024 मध्ये भाजप 300 पेक्षा जास्त जागा घेईल, असेही ते पुढे म्हणाले. याप्रसंगी त्यांनी युपीएच्या काळात काश्मीरमध्ये फोफावलेल्या दहशतवादी घटनांचाही प्रामुख्याने उल्लेख केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारपासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान जम्मूमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. आज पाटणामध्ये फोटोसेशन सुरू आहे. सर्व विरोधी नेते एका मंचावर येत असून भाजप आणि मोदीजींना आव्हान निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, त्यांनी कितीही हात जोडले तरी सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकत नाहीत आणि सर्व विरोधक एकवटले तरी 2024 मध्ये मोदीजी 300 पेक्षा जास्त जागा घेऊन पुन्हा पंतप्रधान होतील हे निश्चित, असे शहा म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी गेल्या 9 वर्षात देशाचा विकास केला आहे. येथील प्रदेशाचाच विचार केला तर, युपीएच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत येथे दहशतवादी घटना सातत्याने घडत होत्या. काश्मीरमध्ये नेहमीच तीन घराण्यांची सत्ता राहिल्याचा दावा करत मोदीजींच्या नेतृत्वाखाली नवीन जम्मू-काश्मीरची निर्मिती होत असल्याचेही ते पुढे म्हणाले.









