अध्याय सत्ताविसावा
पूजास्थानाबद्दल सविस्तर सांगताना भगवंत म्हणाले माझे सगळ्यात महत्त्वाचे पूजास्थान हे सद्गुरू होत. सदगुरु हे ज्ञानधन असून हरिहरांनाही पूर्णपणे वंद्य आहेत. सद्गुरु माझे सत्स्वरूप अधिष्ठान असून आठवे पूजास्थान होय. उद्धवा! ह्या माझ्या आठव्या पूजास्थानाची अखंड आठवण ठेव कारण सद्गुरूंची नुसती आठवण जरी केलीस तरी माझी पूजा केल्याचे पुण्य मिळते. ह्याप्रमाणे उत्तम लक्षणांनी युक्त अशी माझी मूर्ती, यज्ञवेदी, अग्नी, सूर्य, पाणी, हृदय, ब्राह्मण आणि सद्गुरू अशी आठ पूजास्थाने मी तुला सांगितली. आता त्यांच्या पूजेचे भिन्न भिन्न प्रकारही सांगतो ऐक. जरी मी माझी आठ पूजास्थाने तुला सांगितली असली तरी या सर्व स्थानापैकी ज्यामध्ये साधकास अत्यंत गोडी वाटते, तेच पूजेचे मुख्य स्थान मानावे. आपल्या आवडत्या पूजा स्थानाची साधकाने मनोभावे पूजा करावी तरच ती मला पावते. लोकरंजन करण्याची वृत्ती सोडून, दांभिक उपचार टाकून देऊन, कपटाची कृती न करिता खऱ्या भक्तिभावाने भजनतत्पर असावे. ह्यात जी जी निष्कपट सेवा असेल, ती ती देवाधिदेवाला अत्यंत प्रिय आहे. आता पूजेचा सगळा विधीही नीट सांगतो तो ऐक. सद्गुरूचा जो संप्रदाय असेल, त्याप्रमाणे परंपरागत आचार चालवावा. यथाविधी स्नान करून निर्मल भाव धारण करावा. यानंतर वेदोक्त संध्यावंदन इत्यादी नित्यकर्म करावे. त्यानंतर माझ्या आराधनेचाच दृढ संकल्प करून वैदिक आणि तांत्रिक निधींनी कर्मबंधनातून सोडविणारी माझी पूजा करावी. वेदांत सांगितल्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण करावे. निषिद्ध कर्म व काम्य कर्म निखालस टाकून द्यावे, ह्याचंच नाव शुद्ध स्वधर्म आणि हाच उत्तमोत्तम अधिकार होय. आपण होऊन स्वधर्माचा त्याग करणे हाच अधर्म होय. स्वधर्माने चित्ताची शुद्धी करावयाची असते व याकरिता अहंता सोडावयाची असते. ह्याप्रमाणे स्वधर्मकर्म करताना असा भाव मनात उत्पन्न होतो की, यात कर्मकर्ताही मी नव्हे आणि फळभोक्ताही मी नव्हे असं समजायचं प्रमुख कारण म्हणजे देहाला स्वत:चे चैतन्य नसते. ज्या देहात चैतन्य नसते तो देह स्वत:हून काहीच कर्म करू शकत नाही. निर्जीव देहाला जनार्दन चेतना देऊन क्रियाशील करत असतो. त्या चैतन्यामुळेच कर्म करण्याची शक्ती माणसात येत असते. मग ह्यात मी कर्ता आहे किंवा कर्म केल्याने मिळणारे फल माझेच आहे असं म्हणण्याचा प्रश्नच येत नाही पण ही गोष्ट मनुष्य लक्षातच घेत नाही. ज्यांच्या हे लक्षात येतं ते कर्म करून मला अर्पण करतात. अशा विचाराने केलेले कर्माचरण भक्तीमुळे ब्रह्मार्पणच होते आणि साधकाकडून माझी निरभिमानाने उपासन घडते. आता मला पुजण्याच्या स्थानाविषयी सविस्तर माहिती देतो. माझ्या प्रतिमेचे पूजन हेच माझे पहिले पूजास्थान आहे. उद्धवा! त्या प्रतिमा कशाच्या कराव्यात ते सांगतो ऐक. पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मन आणि रत्न अशा वस्तूंचा वापर करून आठ प्रकारे माझी मूर्ती तयार करता येते. विशेष म्हणजे त्यापैकी कोणत्याही साहित्याचा वापर करून तयार केलेल्या मूर्तीची पूजा केली असता त्या तत्काल पावतात आणि भक्ताचे कल्याण करतात. गंडकी नदीतील शाळिग्रामादि शिळेच्या मूर्ती-देवदार, मंदार किंवा ब्रह्मकाष्ठ (पिंपळ) इत्यादि, लाकडाच्या मूर्ती अथवा सुवर्णादि धातूंच्या मूर्ती ह्या साधकांना तत्काळ फळ देणाऱ्या असतात. तशाच माती, कापड, लुकण, यांच्याही मूर्ती करतात, त्यांना ‘लेप्या’ असे म्हणतात किंवा कोणी मोठ्या भक्तीने स्थंडिलावरही लिहून काढतात. त्यांना ‘लेख्या’ मूर्ती म्हणतात. वाळूची मूर्ती करतात तिला ‘सिकतामूर्ती’ म्हणतात. तीही सोन्याच्या मूर्तीप्रमाणेच पूज्य होय. रत्नाची सुंदर मूर्ती, हिऱ्याची, पाचुची, नीलमण्याची, पद्मरागाची किंवा मोत्याची मूर्ती, ह्या सर्वप्रकारच्या मूर्तीही अत्यंत पूज्य होत. सर्व मूर्तामध्ये अत्यंत श्रेष्ठ मूर्त म्हटली म्हणजे ‘मनोमय’ मूर्ती. ती अत्यंत पवित्र होय. तिची उपासना केली असता साधकांना अत्यंत समाधान प्राप्त होते. क्रमश:








