वायनाड येथील सभेत राहुल गांधींचे वक्तव्य ः संसद सदस्यत्व रद्द होण्याची पार्श्वभूमी
वृत्तसंस्था / वायनाड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड येथे रोड शो करत एका जाहीरसभेला मंगळवारी संबोधित केले आहे. माझे घर काढून घेण्यात आले, माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी पोलीस नेमले गेले तरीही मला फरक पडत नाही. प्रसंगी तुरुंगात डांबले गेले तरीही मी प्रश्न विचारत राहणार असल्याचे राहुल यांनी सभेत म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी वायनाड येथे आलो होतो आणि येथील खासदार झालो. माझ्यासाठी येथे निवडणूक प्रचार करण्याचा अनुभव सर्वात वेगळा होता. मी केरळचा रहिवासी नाही तरीही येथील लोकांच्या प्रेमाने मी तुमचा भाऊ, तुमचा मुलगा असल्याची जाणीव करून दिल्याचे उद्गार राहुल यांनी उपस्थित समुदायाला संबोधित करताना काढले आहेत.
लोकसभा सदस्यत्व गमवावे लागल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी हे मंगळवारी पहिल्यांदा केरळमधील वायनाड येथे पोहोचले होते. तेथील कलपेट्टामध्ये त्यांनी 22 मिनिटांपर्यंत रोड शो केला आहे. यादरम्यान प्रियांका वड्रा यांच्यासमवेत अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत दिसून आले. राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीत वायनाड येथून निवडून आले होते.
स्वतःच्या भावासोबत वायनाडचा हा दौरा अत्यंत भावुक करणारा आहे. राहुल यांच्या घरातील फर्निचर काल मी पॅक करत होते. जोपर्यंत राहण्यासाठी नवी जागा मिळत नाही तोवर राहुल हे आईसोबत (सोनिया गांधी) राहणार आहेत. काही वर्षांपूर्वी मला देखील अशाच प्रसंगाला सामोरे जावे लागले होते, तेव्हा मलाही घर बदलावे लागले होते. माझ्या मुलांनी आणि पतीने मला मदत केली होती, परंतु राहुल यांना अशाप्रकारची मदत मिळाली नसल्याचे प्रियांका यांनी सभेला संबोधित करताना म्हटले आहे.
राहुल हे सत्य बोलणारे व्यक्ती आहेत. काही जण राहुल यांचा आवाज दडपू पाहत असले तरीही ते गप्प बसणार नाहीत. राहुल हे नेहमीच लोकांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्याशी संवाद साधतात, लोकांच्या मदतीसाठी धावून जात असतात. जनतेने त्यांची खासदार म्हणून निवड केली परंतु सूरत येथील न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि मग त्यांचे संसद सदस्यत्व संपुष्टात आणले गेल्याचे प्रियांका वड्रा म्हणाल्या.
केंद्र सरकारवर निशाणा
देशाचे मंत्री, खासदार आणि पंतप्रधान हे प्रश्न विचारणाऱया एका नागरिकाला त्रास देत आहेत. राहुल यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसल्याने सरकारकडून हा त्रास दिला जातोय. पूर्ण सरकार गौतम अदानी यांना वाचवू पाहत आहे. राहुल गांधी यांच्यासोबत घडलेला प्रकार हा आमच्या देशात कशाप्रकारची हुकुमशाही सुरु आहे हे दर्शवितो. केंद्र सरकार स्वतःच्या उद्योजग मित्रांना वाचवू पाहत आहे. प्रतिदिन कोटय़वधी रुपये कमावणाऱया व्यक्तीला वाचविण्याचे काम केले जात आहे. आमचे सैनिक सीमेवर सर्वोच्च बलिदानास तयार असताना अदानी हे संरक्षणाशी निगडित प्रकल्प चीनला देत आहेत. आमचे पंतप्रधान अदानींचे रक्षण करतात, परंतु भारतीयांना मदत करत नसल्याची टीका प्रियांका वड्रा यांनी केली आहे.









