ही तर जनतेच्या डोळय़ात धुळफेक आहे- संकल्प आमोणकर
प्रतिनिधी /वास्को
केंद सरकारने कमी केलेले पेट्रोल व डिझेलवरील दर हा जनतेच्या डोळय़ात धुळ फेकण्याचा प्रकार आहे. येणाऱया निवडणुका नजरेसमोर ठेऊन सरकारने दर कमी केलेले आहेत. ही राजकीय धुळफेक जनतेला दिलासा देऊ शकणार नाही. महागाई यापूर्वीच वाढलेली असुन ती आता खाली येणार नाही असे स्पष्ट करून केंद्र सरकारने लादलेल्या महागाई प्रकरणी मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी टीका केली आहे.
आमदार संकल्प आमोणकर यांच्यातर्फे बायणात काल रविवारी होमियोपॅथी मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वैद्यकीय शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता जनतेला मोफत वैद्यकीय शिबिरांची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. गरजू लोकांची सोय व्हावी यासाठी अशी वैद्यकीय शिबिरे दर सहा महिन्यांनी आयोजित करण्याचा आपला विचार असल्याचे आमदार आमोणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. जनता महागाईच्या ओझ्याखाली भरडली जात आहे. केंद्र सरकारने जनतेवर महागाई लादलेली आहे. आणि आता हेच सरकार पेट्रोल व डिझेलचे दर कमी करीत आहे. ही केवळ राजकीय धुळफेक आहे. आधीच वाढलेल्या इंधनाच्या दरांमुळे महागाई प्रचंड वाढलेली आहे. प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढलेले आहेत. आता इंधनाचे दर कमी केले म्हणून महागाई खाली येणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांना दिलासा मिळणार नाही. इंधनाचे दर कमी करण्याचा सरकारचा निर्णय हा येणाऱया निवडणुका नजरेसमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे अशी टीका आमदार आमोणकर यांनी केली.
गोव्यात जनतेला सध्या शासकीय योजनांचे लाभ मिळत नाहीत. लाडली लक्ष्मीचे लाभ 2018 पासून खंडीत झालेले आहेत. गृहआधार, दयानंद सामाजीक सुरक्षा योजनांच्या लाभांसाठी लोक तिष्ठत आहेत. लोकांच्या गरजा पूरवण्याचे सोडून सरकार नवीन राजभवन उभारणार आहे. नव्या राजभवनसाठी पैसा खर्च करण्याची कसलीच गरज नाही. विद्यमान राजभवन हे ऐतिहासिक महत्व असलेले देशातील सर्वोत्कृष्ठ भवन आहे. नवीन भवन उभारण्यामागे सरकारचा वेगळा उद्धेश असावा अशी टीका आमदार संकल्प आमोणकर यांनी केली. पालिका निवडणुका वेळी सरकारने राखीव प्रभागांच्या प्रश्नात घोळ घातला होता. तेव्हा आम्हाला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले होते. आता पंचायत निवडणुकीत तसच घोळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प राहणार नाही. जनतेवरील अन्याय सहन केला जाणार नाही. सरकारला पुन्हा अद्दल घडवू असा ईशारा आमदार आमोणकर यांनी दिला आहे.









