अध्याय सत्ताविसावा
भगवद्भक्ती केल्याशिवाय वैराग्य प्राप्त होत नाही. वैराग्य प्राप्त झाले की, ईश्वरप्राप्ती सुलभ होते असे भगवंतानी सांगितल्यावर उद्धवाला आपणही भगवद्भक्ती यथाशास्त्र करावी म्हणजे ईश्वरप्राप्ती लवकर होईल असे वाटले. त्याने ठरवले की, देवांनाच त्यांच्या पूजेचा विधी विचारावा. हेतू हा की, देव सांगतील तशी पूजा केली की, ती देवांना निश्चितच आवडेल आणि ते आपल्यावर प्रसन्न होतील. असा विचार करून त्याने देवांना पूजाविधी सांगायची गळ घातली. देवांचे आधीच उद्धवावर अत्यंत प्रेम होते. त्याला सोडून निजधामाला जायचे त्यांच्या अगदी जीवावर आले होते. याने जर मी सांगितल्याप्रमाणे पूजाविधी पार पडला तर याचे निश्चितच कल्याण होईल हे लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या आठ पुजास्थानांचा पूजाविधी सांगायला सुरवात केली. ते म्हणाले, श्रीहरीच्या मूर्तीला स्नान घालून मुगुटासह सर्व प्रकारचे अलंकार घालावेत आणि श्रद्धापूर्वक पूजा करावी. स्थंडिल म्हणजे यज्ञवेदी. स्थंडिलावर तत्त्वांचे ध्यान करून त्यावर तत्वविन्यासाचे लेखन करावे. अग्नीची पूजा करताना माझे ध्यान करून तुपाची आहुती देऊन होम करावा. सूर्यनारायणाचे सौरमंत्राने पूजन व स्तवन करावे. जलाचे पूजाविधान म्हटले म्हणजे जलामध्येच जलाने तर्पण करणे हे होय. ‘हृदयामध्ये’ जे माझे पूजास्थान आहे, तेथे मनानेच मनाची पूजा करावयाची असते. माझे मुख्य अधिष्ठान म्हटले म्हणजे ब्रह्ममूर्ती ‘ब्राह्मण’ होत. त्यांचे दासत्वाने आज्ञापालन करणे हेच त्यांचे पूजाविधान होय. ब्रह्मालाही ज्याच्यामुळे ब्रह्मपण येते, ते ‘सद्गुरु’ तर माझे सर्वोपरी श्रेष्ठ व पवित्र पूजास्थान होय. त्यांचे पूजन म्हणजे सर्वस्वी जिवाभावाने त्यांना अनन्य शरण जाणे आणि त्यांच्या वचनाचे तंतोतंत पालन करणे होय. गुरूंची अगदी हलकी सेवाही आवडीने करणे हेच त्यांचे पूजाविधान होय. ह्यानेच साधकांना खरे सौख्य प्राप्त होते. सद्गुरूची सेवा केली असता ब्रह्माशी एकरूपता होण्यासाठी वेगळा खटाटोप करावा लागत नाही कारण ती गोष्ट आपोआपच साध्य होते. त्यामुळे गुरूसेवेपेक्षा श्रेष्ठ असे दुसरे साधन काहीच नाही. सद्गुरूचे स्वरूप हे अखंड पूर्ण ब्रह्म आहे. तेथे आपण आवाहन व विसर्जन कधीही करू नये. पूर्ण निष्कपट भावाने सद्गुरूला जो अनन्य शरण जातो, त्याच्या मीसुद्धा पाया पडतो, इतका तो धन्य असतो. निर्लोभ भावाने पूजा केली असता भगवंताला संतोष होतो. त्याचे रहस्य श्रीकृष्ण सांगत आहेत. ते म्हणाले, माझ्या भक्ताने मला श्रद्धेने पाणी जरी अर्पण केले तरी मला ते अत्यंत आवडते. मग वासाची फुले, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केले, तर काय सांगावे. उद्धवा, माझ्या ठिकाणी अत्यंत प्रेम धरून श्रद्धायुक्त अनन्य भक्तीने जे भक्त मला नुसते उदक अर्पण करतात, त्यांच्या त्या उदकानेही मी संतुष्ट होतो. तो जलबिंदू मी मोठ्या प्रेमाने तोंडात झेलून घेतो. खरं म्हणजे, मी मूळचा सुखस्वरूप आहे पण भक्त ज्या आनंदाने माझी पूजा करतो त्याने मी अधिक सुखी होतो. त्रैलोक्याला माझ्यापासून सुख मिळते असा मी सुखाचा सागर आहे. तरीही भाविकांचे उदक प्याले असता मला परम संतोष होतो. तो जलबिंदू मला किती आवडतो काय सांगू? त्या जलबिंदू इतकी माझी सुंदर लक्ष्मीसुद्धा मला आवडत नाही. ब्रह्मदेव माझ्या पोटी जन्मलेला आहे पण तोसुद्धा भक्ताने अर्पण केलेल्या जलबिंदूपेक्षा कमी आवडतो. इतकेच काय, भक्तांच्या जलबिंदूपुढे मला माझे वैकुंठही फिके वाटते. शेषावर शयन करण्याचे सौख्यही त्याच्या पासंगाला पुरत नाही. भाविकांच्या उदकापुढे मला दुसरे काही आवडत नाही. त्यातच त्याने गंधादिक पूजा केली व षड्रसान्नाचा नैवेद्य दिला तर त्या पूजेच्या सुखाला त्रिभुवनात उपमाच नाही. इतका निष्काम भाविकांच्या भक्तीने मी श्रीपती सुखावतो. निष्काम भाव धरून भगवद्भक्ती केली असता आपण खरोखरच कृतकृत्य होतो अशी ज्याची खात्री असेल, त्याच्या उदकानेही मी तृप्त होतो.
क्रमश:









