जमावाने घेरून केला हल्ला : कारवर फेकले बटाटे-टोमॅटो
► वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात सर्वसामान्य हिंदूंचा छळ नेहमीच होत असतो. परंतु यावेळी सिंधमध्ये एका हिंदूधर्मीय मंत्र्यावर हल्ला करण्यात आला आहे. सिंध प्रांतातील निदर्शक पाकिस्तान सरकारच्या वादग्रस्त सिंचन प्रकल्पाला विरोध करत होते. या प्रकल्पामुळे सिंध प्रांतात सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नद्यांचा प्रवाह कमी होणार असल्याचा निदर्शकांचा आरोप आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये धार्मिक विषयक प्रकरणांचे राज्यमंत्री खेलदास कोहिस्तानी यांच्यावर या निदर्शकांनी हल्ला केला आहे.
या हल्ल्यात कोहिस्तानी यांना कुठलीच ईजा झालेली नाही असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कोहिस्तानी यांच्यावरील हल्ल्याची निंदा करत याप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
लोकप्रतिनिधींवर हल्ला सहन केला जाणार नाही. या घटनेत सामील लोकांना कठोर शिक्षा केली जाणार असल्याचे शाहबाज यांनी म्हटले आहे. कोहिस्तानी सत्तारुढ पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज पक्षाचे सदस्य आहेत.
सिंध पोलीस महानिरीक्षक गुलाम नबी मेमन यांच्याकडून पाकिस्तान सरकारने या हल्ल्याचा तपशील आणि केंद्रीय सचिवांकडून अहवाल मागविला आहे. सिंधचे मुख्यमंत्री सैयद मुराद अली शाह यांनी या हल्ल्याची कठोर शब्दांमध्ये निंदा केली आहे. कुणालाही कायदा स्वत:च्या हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हैदराबाद क्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना हल्ल्यात सामील आरोपींना त्वरित अटक करण्याचा निर्देश दिला आहे.
कोहिस्तानी हे सिंधच्या जामशोरो जिल्ह्याशी संबंधित असून ते 2018 साली पहिल्यांदा पीएमएल-एनच्या तिकीटावर संसद सदस्य म्हणून निवडून आले होते. 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर 2024 मध्ये त्यांना पुन्हा निवडले गेले आणि राज्यमंत्री करण्यात आले.
पाकिस्तानात हिंदूंवर सातत्याने हल्ले
पाकिस्तानात अल्पसंख्याकांच्या विरोधात हल्ले होत असूनही तेथील सरकार कुठलीच पावले उचलत नाही. तर दुसरीकडे सरकारच्या मदतीने पाकिस्तानातील अल्पसंख्याकांचे बळजबरीने धर्मांतर केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील हिंदूंवर हल्ल्याच्या 10 घटना उघडकीस आल्या होत्या. यातील 7 प्रकरणे ही हिंदू मुलींचे अपहरण अन् बळजबरीच्या धर्मांतराची होती.









