महान’
यावषी भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत आहे. भारत देश किती गौरवशाली आहे याचे वर्णन अनेक स्तरातील लोक आपापल्या परीने करतात. जगातील अनेक देशांचे काही ना काहीतरी वैशिष्टय़ आहे तसेच भारताचेही आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्म ज्ञानासाठी पौराणिक काळापासून ओळखला जातो आणि आजही जगातील सर्व देशातून आध्यात्मिक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी परमसत्याचा शोध घेणारे मुमुक्षु भारतामध्ये येत असतात. वेदिक शास्त्रामध्ये वर्णन येते की स्वर्गातील देवतानाही भारतामध्ये जन्म घ्यावासा वाटतो. या जगातील काही लोकांना पुण्यकर्म करून स्वर्गात जाण्याची इच्छा असते कारण तेथे अमर्याद इंद्रियसुख अनंत काळापर्यंत उपभोगता येते. त्यासाठी असे लोक मृत झाल्यावर ‘स्वर्गवासी’ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. परंतु भगवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 9.21) ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते । अर्थात ‘स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा मृत्युलोकात परत येतात, अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून जे इंद्रियोपभोग प्राप्त करतात, त्यांना पुनः पुन्हा केवळ जन्म-मृत्यूच्या चक्रात पडावे लागते.’ ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्मयता नसते त्या वैकुंठलोकांची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्गलोकांमध्ये आणि मृत्यूलोकांमध्ये पुनः पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पडत राहतो. म्हणून सच्चिदानंद जीवन जगण्याकरिता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न परतण्याकरिता मनुष्याने आध्यात्मिक जगताची म्हणजे वैकुंठ लोकांची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. याचे ज्ञान आजही भारतभूमीमध्ये प्राप्त होते म्हणून स्वर्गस्थ देवताही भारतभूमीमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात.
श्रीमद भागवतमध्ये वर्णन येते (भा 5.19.21) एतदेव हि देवा गायन्ति-अहो अमीषां किमकारि शोभनं प्रसन्न एषां स्विदुत स्वयं हरिः । यैर्जन्म लब्धं नृषु भारताजिरे मुकुन्दसेवौपयिकं स्पृहा हि नः। अर्थात ‘मानवी जीवन हे आध्यात्मिक साक्षात्कारप्राप्तीचे उदात्त साधन असल्यामुळे स्वर्गातील देवता अशा प्रकारे गायन करतात-या मनुष्यांना भारतवर्षामध्ये जन्म मिळालेला आहे ही खरोखरच अद्भूत गोष्ट आहे. त्यांनी गतकाळात निश्चितच पुण्यकारक तपश्चर्या केलेली असावी अथवा साक्षात भगवंतच त्यांच्यावर प्रसन्न झाले असावेत, अन्यथा ते कसे काय नानाप्रकारे भक्तिमय सेवा करू शकले असते? आपण देवगण भक्तिमय सेवा करण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची केवळ इच्छाच करू शकतो, पण हे मानव भक्तिमय सेवेमध्ये रमलेलेदेखील आहेत. (भा 5.19.22) किं दुष्करैर्नः क्रतुभिस्तपोव्रतै-र्दानादिभिर्वा द्युजयेन फल्गुना । न यत्र नारायणपादपङ्कज-स्मृतिः
प्रमुष्टातिशयेन्दियोत्सवात् । अर्थात ‘देव पुढे म्हणाले-वेदोक्त यज्ञ, तपाचरण व्रतपालन आणि दान अशी अत्यंत कठीण कार्ये केल्यानंतर आपल्याला स्वर्गनिवासी म्हणून जन्म लाभलेला आहे. पण या लाभाचे व पदाचे मोल ते काय? येथे आम्ही खचितच इंद्रियतृप्तीच्या कार्यांमध्ये गुंतलेले असतो आणि म्हणून आम्ही भगवान नारायणांच्या चरणकमळांचे क्वचितच स्मरण करू शकतो. खरोखर आत्यंतिक विषयोपभोगामुळे आम्हाला भगवंतांच्या चरणांचे पूर्णपणे विस्मरण झालेले आहे.’ (भा 5.19.23) कल्पायुषां स्थानजयत्पुनर्भवात् क्षणायुषां भारतभूजयो वरम् । क्षणेन मर्त्येन कृतं मनस्विनः सन्न्यस्य संयान्त्यभयं पदं हरेः । अर्थात ‘भारतवर्षामध्ये लाभलेले अल्पायुष्य हे ब्रह्मलोकातील लक्षावधी वर्षांनी युक्त प्रदीर्घ आयुष्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे, कारण मनुष्य ब्रह्मलोकी उन्नत झाला, तरी त्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून परत फिरावेच लागते. निम्नतर ग्रहमंडळामध्ये स्थित असणाऱया भारतवर्षातील जीवन जरी अल्पायुषी असलेतरी तेथे निवास करणारा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांना सर्वतोभावे शरण जाऊन स्वतःला कृष्णभावनेच्या स्तरावर उन्नत करू शकतो आणि सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. अशा रीतीने तो वैकुंठलोक प्राप्त करतो आणि वैकुंठामध्ये चिंता व वारंवार जन्ममृत्यू नाही.’ (भा 5.19.24) न यत्र वैकुण्ठकथासुधापगा न साधवो भागवतास्तदाश्रयाः । न यत्र यज्ञेशमखा महोत्सवाः सुरेशलोको।़पि न वै स सेव्यताम्। अर्थात ‘ज्या स्थळी भगवंताच्या लीलांची कथारूपी शुद्ध गंगा वाहत नाही, नदीतटावर सेवारत भक्त नाहीत अथवा भगवंताच्या संतुष्टीप्रीत्यर्थ संकीर्तन यज्ञाचा उत्सव (या कलियुगामध्ये संकीर्तन यज्ञ हा युगधर्म आहे असे अनेक वेदिक शास्त्रात सांगितले आहे) केला जात नाही, ते स्थळ या विश्वातील सर्वोच्च असे असले तरी त्यामध्ये बुद्धिमान व्यक्तीना किंचितही स्वारस्य नसते. (भा 5.19.25) प्राप्ता नृजातिं त्वहि ये च जन्तवो ज्ञानक्रियाद्रव्यकलापसम्भृताम् । न वै यतेरन्नपुनर्भवाय ते भूयो वनौका इव यान्ति बन्धनम् ।अर्थात ‘भारतवर्षामध्ये भक्तिमय सेवेचे आचरण करता येईल अशी योग्य भूमी आणि परिस्थिती आढळते आणि भक्तिमय सेवेच्या आचरणाद्वारे मनुष्य कर्म आणि ज्ञानाच्या परिणामांपासून मुक्त होऊ शकतो. भारतवर्षांमध्ये सुदृढ इंद्रियांनी युक्त मानव देह मिळाल्यानंतर मनुष्याने त्या इंद्रियांद्वारे संकीर्तन यज्ञ करून भक्तिमय सेवेचा स्वीकार करावा. तथापि, त्याने या सुवर्णसंधीचा लाभ घेतला नाही, तर तो पारध्याच्या बंधनातून मुक्त होऊनही केवळ निष्काळजीपणामुळे पुन्हा जाळय़ामध्ये फसणाऱया वन्य पशु-पक्ष्यांप्रमाणेच आहे, हे निश्चित. (भा 5.19.27) सत्यं दिशत्यर्थितमर्थितो नृणां नैवार्थदो यत्पुनरर्थिता यतः । स्वयं विधत्ते भजतामनिच्छता-मिच्छापिधानं निजपादपल्लवम्। अर्थात ‘जो भक्त ऐहिक कामनापूर्तीच्या हेतूने भगवंताकडे जातो, त्याच्या सर्व कामना ते तृप्त करतात, परंतु भक्ताला अधिक ऐहिक वरदाने मागण्यासाठी पुन्हा प्रवृत्त करू शकतील अशी वरदाने ते त्याला कधीच देत नाहीत. तथापि, अशा कामप्रवृत्त भक्तांची आकांक्षा नसतानाही भगवंत त्याला आपल्या दिव्य चरणकमळांचा आश्रय देतात आणि या आश्रयामुळे त्याच्या सर्व कामना तृप्त होतात, ही भगवंताची विशेष कृपा होय. (भा 5.19.28) यद्यत्र नः स्वर्गसुखावशेषितं स्विष्टस्य सूक्तस्य कृतस्य शोभनम् । तेनाजनाभे स्मृतिमज्जन्म नः स्याद् वर्षे हरिर्यद्भ?जतां शं तनोति । अर्थात ‘आम्ही कर्मकांडीय विधी, पुण्यकर्मे, यज्ञाचरण आणि वेदाध्ययन केल्याचा परिणाम म्हणून आता स्वर्गलोकांमध्ये निवास करीत आहोत. तथापि, येथील आमचे जीवन एके दिवशी खचितच समाप्त होईल. म्हणून आमची प्रार्थना अशी आहे की, स्वर्गातील जीवनसमाप्तीसमयी जर आमचे काही पुण्यकर्म उरलेले असेल, तर आम्हाला भारतवर्षात मनुष्यजन्म मिळावा आणि भगवंताच्या चरणकमळांचे स्मरण व्हावे. भगवंत इतके कृपाळू आहेत की ते व्यक्तिशः भारतवर्षामध्ये अवतीर्ण होऊन तेथील निवासींचे भाग्य विस्तारित करतात.’
अशाच आशयाचा संत तुकाराम महाराजांचा एक अभंगही आहे, त्यात ते म्हणतात इहलोकीचा हा देह । देव इच्छिताती पाहे ।।1।। धन्य आम्ही जन्मा आलो । दास विठोबाचे झालो ।।2।। आयुष्याच्या साधने । सच्चिदानंद पदवी घेणे ।।3।।तुका म्हणे पावटणी । करू स्वर्गाची निशाणी ।।4।। अर्थात ‘देवतासुद्धा या मृत्युलोकात मनुष्य लोकांमध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. आम्ही धन्य आहोत कारण मृत्युलोकात मनुष्यजन्माला आलो आहोत आणि विठ्ठलाचे दास झालो आहोत. या मनुष्य जन्माचे परम कर्तव्य आहे आपले सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही स्वर्गाची पायरी करून पुढे जाऊ.’
मनुष्य जन्म तोही भारतामध्ये मिळणे किती भाग्याचे आहे आणि विशेषतः कलियुगात मनुष्यजन्मामध्ये केवळ भगवंताच्या नामस्मरणाने भगवत्प्रेम प्राप्त होते ह्यासाठी देवतासुद्धा भारतामध्ये जन्म घेण्याची इच्छा करतात. म्हणून भारतवर्षामध्ये जन्म घेतलेल्या लोकांनी आपल्या जन्माचा पुरेपूर लाभ न घेता श्वान शुकरांप्रमाणे जीवन व्यर्थ घालविले, तर ते खरोखरच अत्यंत दुर्भागी लोक होत. पण जे मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर हरिभक्ती परायण जीवन जगतात आणि मोक्षपदाला पायदळी तुडवून वैकुंठ लोकांची प्राप्ती करतात ते खरोखरच धन्य आहेत.
-वृंदावनदास








