पुणे / प्रतिनिधी :
यंदा देशाच्या अनेक भागांत मागच्या दोन महिन्यांत थंडीचा प्रभाव जाणवलेला असताना आता फेब्रुवारी महिन्यातही थंडावा जाणवण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत देशाच्या विविध भागांत दिवसाचे सरासरी तापमान हे सरासरीपेक्षा कमी, तर किमान तापमान हे सरासरीएवढे राहण्याचा असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
हवामान विभागाने आपला फेब्रुवारी महिन्यासाठीचा अंदाज जाहीर केला असून, त्यात मासिक कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, हरियाणा, उत्तराखंड, चंदीगड, पंजाब, दिल्ली, जम्मू काश्मीर आदी भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा प्रामुख्याने थंडीचा हंगाम मानला जातो. यात डिसेंबर व जानेवारीमध्ये थंडीचा प्रभाव अधिक असतो. या वर्षी या काळात उत्तरेत थंडीची तीव्र लाट पहायला मिळाली. परिणामी महाराष्ट्रातही थंडीचा कडाका जाणवला. अनेक शहरांतील किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आल्याचे दिसून आले. आता फेब्रुवारीही थंड राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दिल्ली 8.3, तर पुणे 13.9
दरम्यान, महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत सध्या तरी थंडीचा तितकासा जोर दिसत नाही. सकाळच्या सुमारास थंडावा, तर रात्री किंचितसा गारवा अशीच स्थिती असून, दुपारी काही भागात उकाडा जाणवत आहे. गुरुवारी दिल्लीत किमान तापमान 8.3, पुण्यात 13.9, मुंबईत 22.4, कोलकात्यात 16.5, चेन्नईत 23.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मात्र, पुढच्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे आहेत.









