विजेचा वायफळ खर्च : अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक पथदीप दिवसाही सुरू आहेत. त्यामुळे विजेचा वायफळ खर्च होत आहे. तर दुसरीकडे बाजार समितीमधील अनेक पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बऱ्याच भागात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील व्यापारी, कर्मचारी व शेतकरी वर्गाला अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाजार समितीच्या या अनागेंदी कारभाराबद्दल संबंधितांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीमधील विविध रस्त्यावरील अंधार दूर करण्यासाठी पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र यामधील बहुतांश पथदीप बंद अवस्थेत आहेत. त्यातच बंद पथदीप दुऊस्ती करण्याऐवजी त्या पथदिपांना नव्याने फोकस बसविण्यात आले आहेत. बाजार समितीमधील पथदिपावर फोकस बसविण्यात आले आहेत ते बऱ्याचवेळा दिवसाही चालू असतात, असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालातून जो कर शासनाला मिळत असतो त्यातून बाजार समितीमधील विकासकामे करताना वापरायचा असतो. मात्र हा कर दिवसा पण चालू असलेल्या पथदिपांच्या बिलापोटी वायफळ भरला जात आहे. त्यामुळे संबंधित व्यापारी, शेतकरी व कर्मचारी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दिवसा चालू राहणारे पथदीप बंद करावेत, अशी मागणी संबंधितांनी केली आहे.









