कर्ले गावच्या स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल गेला वाहून : अंत्यविधीसाठी डोक्यावरून लाकडे नेण्याची वेळ : स्मशान रस्त्यावर खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य
आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी
सध्या होत असलेला मुसळधार पाऊस, रस्त्यावरील वाहून गेलेला पूल, रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी, गुडघाभर चिखल, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे अशा अवस्थेत कर्ले गावातील स्मशानभूमीचा रस्ता आहे. त्यामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर या रस्त्यावरून स्मशानभूमीपर्यंत जाणे म्हणजे जाणाऱ्यांना अक्षरश: जीवाशी खेळ करावा लागतो आहे. मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाणे म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. त्यामुळे इथे मरण नको रे बाबा… असे म्हणण्याची वेळ कर्ले गावातील नागरिकांवर आली आहे. देश प्रगतीकडे वाटचाल करतो आहे, असे सांगण्यात येते. सध्या देशाची आर्थिक व्यवस्था पाहता देश विकसित भारत बनू लागलेला आहे. याचा प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे. मात्र देशाच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष देणार कोण? असा सवाल बेळगाव तालुक्यातील शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्ले गावातील स्मशानभूमीच्या रस्त्याची अवस्था पाहता उपस्थित होऊ लागला आहे. कर्ले गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल संततधार पावसामुळे वाहून गेला आहे. तसेच रस्त्यावरून थेट डोंगरभागातून येणारे पाणी वाहू लागले आहे. रस्त्याचा बराच भाग उखडून गेलेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून अंत्यविधीला जाणाऱ्या नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत. कर्लेपासून दीड किलोमीटर अंतरावर डोंगर भागात ही स्मशानभूमी आहे. शनिवारी गावातील बळवंत यादोजी खनगावकर यांचे निधन झाले होते. त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी गावातील नागरिकांना अक्षरश: डोक्यावरून लाकडे स्मशानभूमीपर्यंत घेऊन जावे लागले.
अंंत्यविधीला जाणे मोठी कसरत
स्मशानभूमीच्या रस्त्यावरील एका नाल्यावरील पूल पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून डोक्यावरून लाकडे घेऊन जाताना अक्षरश: आपल्या जीवाशी खेळ या गावातील नागरिकांना करावा लागला. प्रत्येकजण आपल्या डोक्यावर छोटी-मोठी पाच-सहा, दहा-बारा लाकडे नेतानाचे चित्र पाहून अक्षरश: हे पाहणाऱ्यांचे हृदय हेलावून गेले. त्यामुळे खरंच या गावातील मरण परवडणारे नाही रे बाबा….असेच साऱ्यांना वाटत होते. आता प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे या स्मशानभूमीच्या रस्त्याचे कामकाज का होत नाही. शनिवारी अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मात्र या रस्त्यावरून येताना आणि जाताना आपल्या मृत्यूशी झुंज देऊनच जावे लागले. कारण कोसळलेल्या पुलावरून इथल्या नागरिकांना स्मशानभूमीकडे जावे लागले आणि गुडघाभर चिखलातून मार्ग काढताना तर अक्षरश: सारेजण थकून, दमून गेले होते. या रस्त्याचा अर्धा भाग काही गावातील नागरिकांच्या खासगी मालकीचा आहे. तर उर्वरित अर्धा भाग हा वनखात्याकडे येतो. गावातील नागरिकांनी रस्ता करण्यासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. मात्र त्यापुढे रस्ता करण्यासाठी वनखात्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
कंत्राटदाराने रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे
आमच्या कर्ले गावातील स्मशानभूमीची खरोखरच दुरवस्था झालेली आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल वाहून गेलेला आहे. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचे वाहन या स्मशानभूमीपर्यंत जात नाही. तसेच सध्या तर या स्मशानभूमीपर्यंत चालत जाणेही अवघड बनले आहे. शनिवारी एका इसमाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंत्यविधी करण्यासाठी आम्ही गावातून डोक्यावरून लाकडे स्मशानभूमीपर्यंत घेऊन गेलो. यावेळी नागरिकांना अतिशय त्रास झाला. या स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निधी मंजूर केलेला आहे. मात्र ज्या कंत्राटदाराला हा रस्ता करण्यासाठी कंत्राट देण्यात आलेले आहे. त्या कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामकाजाकडे दुर्लक्ष केलेले आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या सहा महिन्याभरापूर्वी रस्ता करण्यासाठी मुरूम, माती आणून टाकण्यात आलेली आहे. मात्र अद्याप रस्ता करण्यात आलेला नाही. सदर कंत्राटदराने या रस्त्याचे कामकाज त्वरित सुरू करावे. तसेच स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी हा रस्ता करण्याकरिता वनखात्याने सहकार्य करावे, अशी आमची मागणी आहे.
-विनायक पाटील, ग्रा. पं. सदस्य, कर्ले









