गाय हा हिंदूधर्मियांसाठी अत्यंत पवित्र विषय आहे. गाईला मारणे पाप समजले जाते. गायीचा गौरव ‘गोमाता’ म्हणून केला जातो. तथापि, अनेक गायी बेवारस असून त्या मार्गांवरुन हिंडत असतात. त्यांच्यापैकी अनेक कसायाच्या हाती सापडतात आणि मारल्या जातात. तसे होऊ नये. म्हणून देशात अनेक स्थानी गोशाळा चालविल्या जातात. तेथे अशा गाईंना आश्रय दिला जातो. त्यांना चारापाणी देऊन त्यांचे पोट भरले जाते. त्यांचे औषधपाणी केले जाते. अशा बेवारशी गाईंना जगवणे हा या गोशाळांचा प्रयत्न असतो. विशेषत: उत्तर भारतात अशा अनेक गोशाळा कार्यरत असून त्यांना राजाश्रय आणि लोकाश्रय मिळतो.
छतरपूर येथे अशी एक गोशाळा आहे. तिथे गाईंचा अधिकच सन्मान केला जातो. येथील लोकही अशा प्रयत्नांमध्ये स्वखर्चाने सहभागी होताना दिसतात. ही गोशाळा दिव्यानी छत्रसाल गोशाळा म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या छतरपूर भागात प्रचंड थंडी पडली आहे. माणसांचे सोडाच, पण आयुष्य उघड्यावरच काढणाऱ्या प्राण्यांनाही जगणे कठीण करणारी ही थंडी आहे. या कडाक्याच्या थंडीलाटेपासून गाईंचे संरक्षण करण्यासाठी या गोशाळेच्या व्यवस्थापनाने हवा उष्ण करणाऱ्या हीटर्सची सोय केली आहे. यामुळे या गाईंच्या छोट्या वासरांना मोठाच आधार मिळाला आहे. प्राण्यांनाही माणसासारख्या भावना आणि जाणीवा असतात. तसेच गोरक्षण करणे हे हिंदू धर्मात पवित्र कर्तव्य म्हणून उल्लेखिलेले आहे. त्यामुळे गाईंसाठी ही व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती या गोशाळेच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी दिली. ही गोशाळा पाहण्यासाठीही अनेक लोक येतात. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच ते या उपक्रमाला आर्थिक साहाय्यही सढळहस्ते करतात. एकंदर, काही जणांच्या मते गाईंचे हे लाड अनाठायी असले तरी, बहुसंख्य लोकांना गाईंचे संरक्षण व्हावे असेच वाटते. त्यामुळे या गोशाळेला सर्वसामान्य लोकांचा मोठा आधार आजवर मिळत आलेला आहे.









