कर्वे-गावडोंगरी येथील प्रकार, दुरुस्तीची मागणी
काणकोण : काणकोणात सध्या जोरात पाऊस चालू असून त्यात काही ठिकाणच्या रस्त्यांची वाताहत झालेली आहे. कर्वे, गावडोंगरी येथील शेतजमिनीच्या समोरचा रस्ता पहिल्याच पावसात खचला असून या रस्त्याच्या बाजूला असलेला नाला देखील एका बाजूने खचला आहे. त्यामुळे हा भाग वाहतुकीला अत्यंत धोकादायक बनलेला आहे. या मार्गावरून दिवसभर प्रवासी बसेस, स्कूल बसेस त्याचप्रमाणे शेकडो दुचाकीस्वारांची ये-जा चालू असते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण होऊन वर्ष सुद्धा उलटलेले नाही तोच रस्त्याचा एक भाग खचल्यामुळे त्वरित दुरुस्ती केली नाही, तर या ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.









