वाडे – कुर्डीतील संतप्त रेशन कार्डधारकांचा रोष : किडे पडलेल्या, बुरशीयुक्त तांदळाचे वाटप,सांगे नागरी पुरवठा कार्यालयावर नेला मोर्चा
सांगे : सांगेतील वाडे-कुर्डी येथील शिधापत्रिकाधारकांना अक्षरश: किडे पडलेल्या बुरशीयुक्त तांदळाचे वितरण करण्यात आले असून काल शुक्रवारी सकाळी वाडेतील बऱ्याच नागरिकांनी स्थानिक पंचायत सदस्य चंदन उनंदकर आणि जोझेफिना रॉड्रिग्स यांच्यासह सांगेतील नागरी पुरवठा कार्यालयाला धडक दिली आणि अधिकाऱ्यांना याबद्दल जाब विचारला. आम्ही माणसे आहोत की, जनावरे, असा सवाल त्यांनी केला. जनावरे सुद्धा हा तांदूळ खाणार नाही, असे त्यांनी बोलून दाखविले. उनंदकर यांनी सांगितले की, आपण बुधवारी बुरशीयुक्त व किडे पडलेला तांदूळ घेऊन सांगेच्या नागरी पुरवठा कार्यालयात येऊन साहाय्यक निरीक्षक संजीव नाईक यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्याचदिवशी नाईक यांनी वाडे-कुर्डी येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन पाहणी केली आणि यापुढे हा तांदूळ वितरित केला जाणार नाही तसेच ज्यांनी तांदूळ नेला आहे त्यांना तो बदलून देण्यात येईल असे आपल्याला आश्वासन दिले. आपण तशी कल्पना शिधापत्रिकाधारकांना दिली. पण घडले भलतेच. दुसऱ्या दिवशी स्वस्त धान्याच्या दुकानदाराने पुन्हा त्याच तांदळाचे वाटप सुरू केले. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांत तीव्र संताप निर्माण झाला, असे त्यांनी सांगितले.
सहनशीलतेचा अंत पाहू नका : रॉड्रिग्स
अशा प्रकारचे तांदूळ वितरित करण्यापेक्षा त्यांचा पुरवठाच बंद करा किंवा चांगले तांदूळ उपलब्ध करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. तांदळातील किडे पाहून मुले जेवायला कटकटी करतात. लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे पंच जोझेफिना रॉड्रिग्स म्हणाल्या. नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांनी या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
अधिकारी झाला निरुत्तर
अनेकांना सडलेला आणि अळ्या असलेला तांदूळ मिळाला आहे. गोदामातून अशा प्रकारचा तांदूळ स्वस्त धान्य दुकानदाराला का देण्यात आला, असा सवाल शिधापत्रिकाधारकांनी अधिकारी नाईक यांच्यासमोर उपस्थित केला. त्यावेळी नाईक यांनी तांदळाची गुणवता ‘एफएसएसएआय’द्वारे प्रमाणित करण्यात येत असल्याचे सांगितले. असे असेल, तर मग हा बुरशीयुक्त तांदूळ का व कसा दुकानदाराला देण्यात आला असे शिधापत्रिकाधारकांनी विचारले असता अधिकारी त्यावर उत्तर देऊ शकला नाही.
चांगला तांदूळ दिला, तरच नेऊ
यावेळी शिधापत्रिकाधारकांनी साहाय्यक निरीक्षक संजीव नाईक यांना सक्तपणे बजावले की, यापुढे चांगला तांदूळ दिला, तरच आम्ही नेऊ. अन्यथा बुरशीयुक्त तांदूळ आल्यास तो नेला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर नाईक यांनी सध्याचा तांदूळ बदलून देणार आणि यापुढे चांगला तांदूळ दिला जाईल, असे सांगितले.
तांदुळ नेण्यासाठी रेशन दुकानदारांवर सक्ती
गेल्या सहा महिन्यांपासून वाडे-कुर्डीतील स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट व बुरशीयुक्त तांदूळ वितरित केला जात असल्याचे मोनो गावकर यांनी सांगितले. सध्या वितरित केलेल्या तांदळात किडे तसेच अळ्या आहेत. माणूस सोडाच, जनावरे सुद्धा खाणार नाही असा हा तांदूळ आहे, असे यावेळी सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सांगे तालुक्यातील अन्य काही स्वस्त धान्य दुकानांतही बुरशीयुक्त तांदूळ गोदामातून पुरविण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. काही स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली असता तांदळाच्या गोण्यांवर बुरशी निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. आम्ही नको म्हटले, तरी गोदामातून हा खराब तांदूळ नेण्यासाठी सक्ती केली जाते, अशी माहिती दुकानदारांकडून मिळाली आहे.
निकृष्ट असल्याने लोक धान्य नेत नाहीत : उनंदकर
गहू देखील निकृष्ट असून त्यामध्ये ’बरड’ पडल्याचे सर्रास जाणवते. हा गहू आणल्यानंतर तो साफ करून आणि पाण्याने धुवून, वाळून पीठ करावे लागते. सरकार असे निकृष्ट धान्य देऊन लोकांच्या जिवाशी खेळत आहे, असा लोकांचा आरोप आहे. एकूणच या प्रकाराबद्दल शिधापत्रिकाधारकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापुढे असे प्रकार घडल्यास आम्ही तांदूळ, गहू नेणारच नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. निकृष्ट तांदूळ आणि गहू मिळत असल्याचे लोक त्याची उचल करत नाही हे खरे कारण आहे. हे सरकारने लक्षात घेतले पाहिजे. उगाच धान्य नेले नाही, म्हणून शिधापत्रिका रद्द करू नयेत, असे उनंदकर यांनी सांगितले. वाडे-कुर्डी स्वस्त धान्य दुकानात काही महिन्यांपूर्वी शिधापत्रिकेवर दहा किलो तांदूळ समजा एखाद्या शिधापत्रिकाधारकाला नको असल्यास त्याच्या बदल्यात त्याला दोन किलो साखर मिळायची हे नागरी पुरवठा अधिकाऱ्यांच्या लक्षात लोकांनी आणून दिले असता खात्याची अशी कोणतीच योजना नव्हती, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी भारती नाईक, गीता पेरेरा यांनी देखील अळ्या असलेला तांदूळ खायचा कसा असा सवाल करून चांगला तांदूळ पुरविण्याची मागणी केली.









