डॉल्फिनवर झाले संशोधन
जटिल संरचना असलेल्या मेंदूमुळे माणूस केवळ बोलत नाही, तर अनावश्यक गोष्टी म्हणजेच गॉसिप देखील करू शकतो. गॉसिपवर वैज्ञानिकांनी सातत्याने अनेक अध्ययने केली असून यातून अनेक मजेशीर निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गॉसिपमुळे लोक परस्परांशी जोडले जातात, गॉसिप करणारे लोक परस्परांचे चांगले मित्र होतात असे सांगण्यात येते. माणसासह पृथ्वीवरील अनेक प्राण्यांना गॉसिप करण्यास मजा येते, यात डॉल्फिनचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

नेचर इकोलॉजी अँड इव्होल्युशनर नावाच्या नियतकालिकात याविषयी एक अध्ययन प्रकाशित झाले आहे. स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या तज्ञांनी सागरीसृष्टीचे अध्ययन करत डॉल्फिन मासे परस्परांमध्ये गॉसिप करत असल्याचा शोध लावला आहे. डॉल्फिन माशांच्या गॉसिपचा पॅटर्न समजून घेण्यासाठी विशेष प्रकारच्या मायक्रोफोनचा वापर करण्यात आला, यात ऐकू आलेला ध्वनी डीकोड केल्यावर वैज्ञानिकांना हे मानवी संभाषणाप्रमाणेच होते असे आढळून आले आहे.
एक डॉल्फिन काही सांगू इच्छित असल्यास ते सुमारे 5 शब्दांचे वाक्य असते. यानंतर एक छोटासा पॉज असतो, मग दुसरा डॉल्फिन काहीतरी सांगतो, कुठलाच मासा दुसऱयाला बोलताना मध्येच अडवत नाही. वैज्ञानिकांना संभाषणाचा अर्थ जाणून घेता आला नसला तरीही हे सामान्य प्राण्यांमधील संभाषणापेक्षा वेगळे असल्याचे कळले. अन्यथा डॉल्फिन धोक्याच्या इशाऱयासाठी किंवा संतापात आवाज काढत असतात.
मेंदू विकास गॉसिपचे एक कारण
तज्ञांनी याला कल्चर ब्रेन हायपोथिसिस मानले आहे. यात मेंदू उर्वरित प्राण्यांच्या तुलनेत अधिक विकसित असतो. अशाप्रकारच्या मेंदूमध्ये आवश्यक गोष्टींसह अनावश्यक गोष्टींसाठीही जागा असतो. हीच बाब डॉल्फिन्सवर देखील लागू होते. डॉल्फिन्स समुहात राहतात आणि संभाषणाद्वारे मित्र अन् शत्रूही तयार करतात.
गॉसिप करणे वाईट नाही
2019 मध्ये सेज या नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार दरदिनी माणूस सुमारे 52 मिनिटांपर्यंत अनावश्यक संभाषण करत असतो. परंतु हे नेहमी दुसऱयाबद्दल वाईट बोलणे असेलच असे नाही. तर याचा 15 टक्के हिस्साच इतरांबद्दल प्रतिकूल मते मांडण्याशी निगडित असतो. उर्वरित काळ शब्दांचा आनंद घेणारा असतो असे या अध्ययनात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या सायकोलॉजी विभागाने नमूद केले आहे.
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये प्रमाण अधिक
पुरुष गॉसिप करण्यात अव्वल असतात असे या अध्ययनातून समोर आले. 18-58 वयोगटातील तीनशे पुरुष आणि महिलांवर करण्यात आलेल्या अध्ययनाच्या अंतर्गत त्यांचे टेलिफोनिक संभाषण ऐकले गेल. यातून प्राप्त झालेले निष्कर्ष अत्यंत वेगळे आहेत. पुरुष दिवसातील 76 मिनिटांपर्यंत गॉसिप करतात, तर महिला 50-55 मिनिटांपर्यंत गॉसिप करत असतात.









