त्वरित घरे मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या शहापूर येथील रहिवाशांकडून वाजपेयी वसती योजनेंतर्गत घरे मिळविण्यासाठी 2012 मध्ये अर्ज करून रक्कम भरण्यात आली आहे. मात्र, अद्यापही महानगरपालिकेकडून घरे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे गोरगरीब नागरिकांची परवड होत आहे. याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घरे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीचे निवेदन शहापूर येथील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे महसूल निरीक्षक एस. एम. परगी यांना देण्यात आले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील शहापूर येथील रहिवाशांना वाजपेयी वसती योजनेंतर्गत जी+3 नमुन्याची घरे निर्माण करून देणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी 2012 मध्ये या भागातील 300 पेक्षा अधिक गोरगरीब नागरिकांनी घरांसाठी 50 ते 66 हजार रुपये महानगरपालिकेला भरणा केले आहेत. पैसे भरलेल्या नागरिकांना पत्रही देण्यात आले आहे.
मात्र, अद्याप या योजनेंतर्गत घरे मंजूर झालेली नाहीत. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता केवळ आश्वासने दिली जात आहेत. यासाठी अनेक वेळा निवेदनही देण्यात आले आहे. जागा मंजूर झाली आहे, लवकरच इमारती उभारण्यात येतील, असे सांगितले जात आहे. मात्र, 12 वर्षांचा कालावधी उलटला तरी पूर्तता झालेली नाही. कर्ज काढून पैसे देण्यात आले आहेत. त्यामुळे गोरगरिबांची परवड होत आहे. महानगरपालिकेकडून घरे बांधून देणार असल्याचे सांगितले जात आहे. या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. 2022 मध्ये इमारतीच्या कामासाठी भूमीपूजन करण्यात आले होते. मात्र, 20 महिन्यांचा कालावधी उलटला तरी कोणतीच हालचाल दिसून येत नाही. याची दखल घेऊन त्वरित घरे मंजूर करून द्यावीत, अशी मागणी रहिवाशांतर्फे करण्यात आली आहे. यावेळी एस. आर. कांबळे, एन. आर. हुलीमनी, एस. जी. क्षीरसागर, शंकर मोकी आदी नागरिक उपस्थित होते.









