राज्यात सत्तांतर झाले नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मिळाले त्याला आता एक महिना होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, अतिवृष्टीमुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र जिह्याला पालकमंत्री नसल्याने या सर्व कामात उशिर होत आहे, कधी नव्हे ते राज्याच्या राजकारणात नव नवीन घडामोडी घडत आहेत आणि यातून रोज समाजमाध्यमांवर मनोरंजन होत आहे. त्यातच काल एक आलेला संदेश असा की एक पिता आपल्या मुलाला सांगतो की तुमची पिढी खूप नशीबवान आहे. तुमच्या मनोरंजनासाठी निदान राजकीय मंडळी तरी आहेत, आम्हाला तर मनोरंजनासाठी डोंबाऱयाच्या खेळावर अवलंबून राहावे लागायचे या संदेशावरुनच कळते की सध्याचे राजकारण कीती खालच्या थराला गेले आहे.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आणि त्यापूर्वी 2014 ला शिवसेना भाजपचे सरकार असल्यापासून राऊत यांचे प्रस्थ महाराष्ट्राच्याच नव्हे तर केंद्राच्या राजकारणात आणि शिवसेनेत चांगलेच वाढले होते. 2014 ला शिवसेना राज्यात आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत असतानाही राऊत यांनी थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर तसेच राज्यातील नेत्यांवरही टिका करण्याची एकही संधी सोडली नाही. राज्यात भाजपला वगळून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससह बनविलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचे चाणक्य हे संजय राऊत होते. त्यामुळे ते गेल्या अडीच वर्षापासून अनेकांच्या रडारवर होते. गेल्या अडीच वर्षात शिवसेनेवर आणि उध्दव ठाकरेंवर ज्या ज्या लोकांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन हल्ला केला त्याला रोज आपल्या वक्तव्यातून आणि शिवसेनेच्या मुखपत्रातून अंगावर घेण्याचे काम राऊत रोखठोखपणे करत होते. गेली 20 वर्ष राऊत हे दिल्लीच्या राजकारणात असल्याने त्यांना राष्ट्रीय राजकारणाची चांगली जाण आहे. त्यातच शिवसेनेची राष्ट्रीय राजकारणात प्रतिमा निर्माण करण्याचं काम हे मनोहर जोशीनंतर राऊत यांनी केले हे नाकारता येणार नाही. राऊत यांच्यामुळेच गेली अडीच वर्षे अडगळीत गेलेले आणि गेल्या पंधरा दिवसात पुन्हा एकदा आक्रमक झालेले नेते रामदास कदम हे आता शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या विरोधातच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. याच रामदास भाईनीं कधी काळी सेना भाजप युती असताना भाजपची औकात काढली होती. तेच रामदास भाई आता मात्र संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली गेली असल्याचा आरोप करत आहेत आणि उध्दव ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ सोडावी असे सांगत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही राऊत यांनी ठामपणे शिवसेनेची आणि उध्दव ठाकरेंची बाजु मांडली त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन बोलणाऱया बंडखोर आमदारांना 2014 ला भाजपने युती तोडली तेव्हा तुमचे हिंदुत्व कुठे होते, आणि 2019 पासून गेल्या अडीच वर्षात उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर आरोप तसेच हल्ले केल्यानंतर कितीजण पुढे आले होते, असा खरमरीत सवाल केला त्याचे कोणीही उत्तर दिले नाही. खोचक बोलत विरोधकांचा समाचार घेण्यात राऊत हे माहीर होते. राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी स्वतः उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच मैदानात उतरावे लागणार असे सध्या तरी दिसत आहे.
शिंदे गटाने शिवसेनेच्या आमदारांवर व्हिप मोडल्याप्रकरणी ज्या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव नाही तर राऊत यांच्यानंतर अनिल परब, रवींद्र वायकर, अरविंद सावंत, अनिल देसाई, सुभाष देसाई यांच्यापैकी अनिल परब आणि रवींद्र वायकर यांच्या केंद्रीय तपास यंत्रणांचा आरोप आहे तर सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचा पिंड बघता आता शिवसेनेची बाजु मांडण्याची जबाबदारी स्वतः उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत यांनाच घ्यावी लागणार आहे. आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांवर रोज आरोप करत आहेत. हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा असे ते बंडखोर आमदारांना बोलत आहेत.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्यात आणि केंद्रात एका विचारांचे सरकार आल्याने राज्याचा विकास होईल, अनेक प्रलंबित योजना मार्गी लागतील केंद्राकडून मोठय़ा प्रमाणात निधी मिळेल आणि गेल्या अडीच वर्षात जे राज्याचे नुकसान झाले ते भरून निघेल अशी अपेक्षा असताना अद्यापही राज्यातील सत्तासंघर्ष पेच कायम असून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सरकारचे भवितव्य हे न्यायालयाच्या निकालावर अबलंबून असल्याचे बोलले जात आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी विरूध्द भाजप यांच्यात रोज वाद होत असताना त्यात भर म्हणजे राज्याचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादगस्त विधान करताना आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचे काम केले. मुंबईच्या विकासात राजस्थानी आणि गुजराती समाजाचे मोठे योगदान असल्याचे वक्तव्य करताना राज्यपालांनी वाद ओढवून घेतला. त्यामुळे गेला महिनाभर प्रंटफुटवर खेळत असलेल्या भाजप नेत्यांना राज्यपालांच्या या वक्तव्याने बॅकफुटवर जावे लागले.
जे.पी नड्डांचा प्रादेशिक पक्षांना इशारा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा करताना महाराष्ट्रात समाप्तीच्या मार्गावर असलेली शिवसेनादेखील एका कुटुंबाचा पक्ष आहे. अशाच प्रकारे काँग्रेस बहीण-भावाचा पक्ष बनला आहे, अशी टीका त्यांनी करताना जे अद्याप संपले नाहीत, तेदेखील संपतील. राहील तो फक्त भाजप, असे म्हणताना त्यांनी प्रादेशिक पक्षांना जणू इशारा दिला आणि केला आहे.
प्रवीण काळे








