फळ्या व्यवस्थित न घातल्याने समस्या : शेतकरी वर्गातून चिंता
वार्ताहर /उचगाव
सार्वजनिक पाटबंधारे खात्याच्या वतीने मार्कंडेय नदीच्या सुळगे(हिं.) गावाजवळील असलेल्या पात्रामध्ये बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवण्याची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात केली आहे. मात्र पाणी पूर्णत: न अडवल्याने नदीच्या पात्रात सुरुवातीपासून जितकं पाणी अडविण्यात आले आहे, तितकाच पाण्याचा साठा आहे. इतकेच जर पाणी राहीले तर पुढील काळात याचा मोठा धोका शेतकरी वर्गाला होणार आहे. यासाठी नदीच्या काठोकाठ पाण्याचा साठा राहील, अशी फळ्dया घालण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी शेतकरीवर्गातून जोरदार मागणी करण्यात येत आहे. उचगाव परिसरातील मार्कंडेय नदीला सुळगे गावाजवळ घालण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या फळ्या योग्यरीतीने न घातल्याने पाणी झिरपून नदीपात्रातील पाण्याचा साठा कमी कमी झाल्याने पुढील काळात शेतातील पिके कशी जगवावी, याची चिंता शेतकरीवर्गाला लागून राहिली आहे.
चालू वर्षीच्या हंगामात एक तर पावसाने पूर्णत: दगा दिल्याने माळ जमिनीतील त्याचबरोबर शेतवडीतील सर्वच पिकांना धोका निर्माण झालेला आहे. पिके पन्नास टक्के सध्या खराब झाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त आहे. याबाबत या भागातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार मार्कंडेय नदीला सुळगे, उचगाव गावाजवळ असलेल्या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवण्याची प्रक्रिया दरवर्षी केली जाते. मात्र चालूवर्षी सदर पाणी अडवण्याची प्रक्रियाही ऐन पावसाळ्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यातच करण्याची वेळ आली आहे. बंधाऱ्याला फळ्dया घालतेवेळी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. ते सार्वजनिक पाटबंधारे खात्याच्या वतीने घेतले जात नसल्याने फळ्या व्यवस्थित न घातल्याने पाणी झिरपून तसेच फळांची उंची जितकी हवी तितकी न वाढवल्याने नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पिकांना पुढील काळात म्हणजे येत्या एक दोन महिन्यातच धोका निर्माण होणार आहे.
उचगाव परिसरातील बाची, शिनोळी, तुरमुरी, कल्लेहोळ, उचगाव, सुळगा, गोजगा, आंबेवाडी, मण्णूर भागातील शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेली आहे. या शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजेच रब्बी हंगामातील बटाटा, मिरची, कोबीज, नवलकोल, बावची, भेंडी अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला तसेच ऊस पिकांची लागवड करण्यात येते. मात्र नदीपात्रातील पाणीपातळी कमी असल्याने नजीकच्या काळात संपूर्ण बियाणांची लागवड कशी करावी आणि सदर पिके पुढेही पाण्याविना तग धरतील का, अशी शंका शेतकरी वर्गाला आतापासूनच सतावू लागली आहे. नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी मेअखेरपर्यंत टिकून राहणे गरजेचे असते. तर शेतवडीतील अनेक पिकांना याचा लाभ होऊन भरघोस पिके दरवर्षी येऊ शकतात. याबरोबरच या भागातील सर्व सार्वजनिक विहिरीना पाण्याची पातळी टिकून राहण्यासाठी या नदीपात्रातील पाणी अतिशय महत्त्वाचे असते. मात्र शासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे याचा फटका सर्व शेतकरी, नागरिकांना दरवर्षी बसत असतो. पाण्याचा साठा टिकून ठेवण्यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून करण्यात येत आहे.









