आयटीबीपी कॅम्पमध्ये झाली होती चोरी
प्रतिनिधी /बेळगाव
हालभावी येथील आयटीबीपी कॅम्पमधून दोन एके-47 रायफली चोरीला जाऊन पंधरा दिवस उलटले. तरी अद्याप त्यांचा शोध लागला नाही. अतिसुरक्षित अशा आयटीबीपीच्या तळावरून चोरी करण्याचे धाडस कोणी केले? याचा तपास करण्याची गरज आहे.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्या नेतृत्वाखाली या चोरी प्रकरणाचा तपास सुरू आहे. पंधरा दिवसांच्या काळात काकती पोलिसांनी अनेकवेळा आयटीबीपी कॅम्पला भेटी दिल्या आहेत. तिसऱया मजल्यावरील बराकीतून दोन रायफली चोरीला गेल्या आहेत. सुरक्षित लष्करी तळावरून चोरी कशी झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम तपास अधिकारी करीत आहेत.
बुधवारी 17 ऑगस्ट रोजी चोरीची घटना उघडकीस आली आहे. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी स्वतः आयटीबीपी कॅम्पला भेट देऊन पाहणी केली आहे. सुरुवातीला चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाचा वापर झाला. मात्र त्यामुळे चोरी प्रकरणाच्या तपासाला गती मिळेल असा सुगावा लागला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
प्रशिक्षणासाठी मदुराई येथून बेळगावला आलेल्या राजेशकुमार व संदीप मीना या जवानांच्या एके-47 चोरीला गेल्या आहेत. नक्षलविरोधी कारवाईचे प्रशिक्षण घेण्यासाठी हे जवान हालभावी येथील आयटीबीपी कॅम्पला आले आहेत. 29 जुलैपासून प्रशिक्षण सुरू आहे. 12 सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहे. या अत्याधुनिक रायफली कोणी चोरल्या? याचा तपास करण्यात येत आहे.









