मध्यवर्ती बसस्थानकातील प्रकार : प्रवाशांची गैरसोय, फलाटसह इतर कामे अर्धवट
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्घाटन होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप फलाट आणि इतर कामे सुरूच आहेत. उद्घाटनानंतर कामांना गती मिळाली आहे. त्यामुळे परिवहनचा वरातीमागून घोडे असा प्रकार सुरू आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत तब्बल 34 कोटींच्या निधीतून बसस्थानकाचा विकास साधण्यात आला. मात्र गतवर्षी काम अर्धवट ठेऊन घाईगडबडीत श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात आले. मात्र अद्यापही फलाट उभारणी आणि इतर कामे शिल्लक आहेत. त्या कामांना आता चालना देण्यात आली आहे. त्यामुळे कामे पूर्ण न होताच बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आल्याचे दिसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात लांब पल्ल्याच्या आणि शहरी बसेससाठी स्वतंत्र फलाट उभारणी करण्यात आली आहे. मात्र बसेसच्या तुलनेत फलाटांची संख्या कमी असल्याने बस इतरत्र थांबविल्या जात आहेत. यासाठी आता बसस्थानकाच्या अंतर्गत भागात नवीन फलाट तयार केले जात आहे. गतवर्षी थाटामाटात उद्घाटन सोहळा झाला. मात्र बसस्थानकात अपुऱ्या सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोय झाली. अद्यापही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. फलाटांचा अभाव आणि इतर गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. बसस्थानकातील अंतर्गत भागात फलाट उभारले जात आहेत. गतवर्षी उभारलेले फलाट कमी पडू लागले आहेत. उद्घाटन होवून एक वर्ष उलटले तरी अद्याप फलाट आणि इतर कामे सुरूच आहेत. त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय होवू लागली आहे. शिवाय बस थांबविताना अडचणी येवू लागल्या आहेत.









