निपाणीत डॉ. बाबासाहेबांच्या भेटीला आज 100 वर्षे पूर्ण
अमर गुरव/निपाणी
चळवळीतून घडलेले आणि विकासातून बहरत असलेले निपाणी शहर अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. निपाणीत किंबहुना कर्नाटकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श 11 एप्रिल 1925 रोजी पहिल्यांदा झाला. या घटनेला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. चंदन उगळावे तसा सुगंध दरवळतो त्याप्रमाणे शंभर वर्षांनंतरही निपाणीच्या मातीत आंबेडकरी विचारांचा सुगंध दरवळत आहे, किंबहुना तो अधिकच पसरत आहे.
दलित बहिष्कृत परिषदेचे तिसरे अधिवेशन 11 एप्रिल 1925 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली निपाणीतील चंद्रमा टॉकीज (तत्कालीन मल्लिकार्जुन थिएटर) येथे झाले होते. या सभेचे स्वागताध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष मारुती ज्योती रावण हे होते. ही सभा घेण्यासाठी बेळगाव जिह्याचे मागासवर्गीय नेते देवराय इंगळे व नगरपालिकेच्या तत्कालीन सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेतला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राहण्याची व्यवस्था नगरपालिकेत करण्यात आली होती.
डॉ. आंबेडकरांना निपाणीमध्ये घेऊन येऊन आंबेडकरी विचार देणारे इंगळे हे पहिले मानकरी आहेत. कर्नाटकातील पहिली सभा निपाणीमध्ये झाली असल्याने या सभेला अत्यंत असे ऐतिहासिक महत्त्व आहे. निपाणीला बाबासाहेबांनी एकूण आठवेळा भेट दिली. बाबासाहेबांच्या हयातीत त्यांचा घोड्यावर बसलेला एकमेव फोटो हा निपाणीतील आहे. विशेष म्हणजे ‘शासनकर्ती जमात व्हा’ हा क्रांतिकारी संदेश बाबासाहेबांनी निपाणीच्या भूमीतून दिला आहे. शंभर वर्षांनंतरही निपाणीच्या या मातीत बाबासाहेबांच्या विचारांची बिजे दररोज पेरली जातात आणि दररोज उगवतात असे चित्र दिसते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक भेटीला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने निपाणी शहरात विविध पक्ष व संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 11 रोजी सकाळी 11 वाजता सर्वांनी आहे त्याठिकाणी शंभर सेकंद थांबून अभिवादन करण्याचे आवाहन प्रथम पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. याबरोबरच रॅली, प्रतिमापूजन, प्रस्तावना वाचन आदी विविध उपक्रम पार पडणार आहेत.









