प्रतिनिधी/ बेळगाव
धारवाड-बेळगाव पॅसेंजर रेल्वेच्या बोगीत आढळून आलेल्या तीन वर्षीय बालिकेच्या मृतदेहाची 11 दिवसांनंतरही ओळख पटली नाही. दोन दिवसांपूर्वी त्या बालिकेचा मृतदेह दफन करण्यात आला आहे.
15 मार्च रोजी बेळगाव रेल्वे यार्डमध्ये बोगीची साफसफाई करताना सुमारे 3 वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आसनाखाली आढळून आला होता. त्याचदिवशी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सध्या सीआरपीसी कलम 174 (सी) अन्वये संशयास्पद मृत्यूप्रकरण दाखल करण्यात आले आहे. बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर, बागलकोटसह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन रेल्वे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या प्रयत्नांना यश आले नाही. बुधवार दि. 22 मार्च रोजी अखेर त्या बालिकेचा मृतदेह सरकारी स्मशानभूमीत दफन करण्यात आला आहे.









