इतिहासात प्रथमच अशी नियुक्ती, सामरिक संबंध सुदृढ करणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
युरोपियन महासंघाने भारतात आपला सेनादूत (मिलीटरी अॅटॅची) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यायोगे भारताशी अधिक दृढ सामरिक संबंध प्रस्थापित करण्याचे महासंघाचे धोरण आहे. इतिहासात प्रथमच भारतात अन्य कोणत्या देशाकडून किंवा राष्ट्रसमूहाकडून अशी नियुक्ती होत आहे. प्रशांत भारतीय प्रदेशात युरोपियन महासंघ अमेरिकेसह एक प्रबळ शक्ती म्हणून कार्य करण्याचे धोरण तयार करत आहे. त्यात महासंघाला भारताचाही सक्रिय सहभाग हवा आहे. म्हणून भारतात सेनादूत नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढच्या महिन्यात ही नियुक्ती केली जाईल, अशी माहिती महासंघाचे भारतातील राजदूत हर्व्ह डेल्फिन यांनी गुरुवारी केली. महासंघाचे भारताशी अत्यंत बळकट अशा स्वरुपाचे सामरिक संबंध निर्माण होत आहेत, याचे द्योतक म्हणून या नियुक्तीकडे पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारताच्या आरोपाचे गांभीर्य
प्रशांत भारतीय क्षेत्रात जेव्हा नियमाधारित व्यवस्थेला आव्हान दिले जात होते आणि एकाधिकारशाही निर्माण केली जात होती, त्यावेळी युरोपियन महासंघ शांत होता, असा आरोप भारताने काही वर्षांपूर्वी केला होता. तो आता महासंघाने गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. महासंघाचा व्यापार प्रामुख्याने याच प्रशांत भारतीय क्षेत्रात चालतो. तेथे नियमाधारित व्यवस्था कोणत्या देशाने धाब्यावर बसविली, तर या व्यापाराला धोका पोहचू शकतो. त्यामुळे आता महासंघाने आपले या क्षेत्रातील बस्तान भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येते. भारतालाही आपल्या प्रयत्नात समाविष्ट करण्याची त्याची योजना आहे.
चीनशी संबंध चांगले, पण…
युरोपियन महासंघाचे चीनशी भक्कम संबंध आहेत. द्विपक्षीय व्यापारही वृद्धिंगत होत आहे. तथापि, व्यापारातील खुलेपणाला कोणी हानी पोहचवित असेल तर महासंघ ते खपवून घेणार नाही. द्विपक्षीय व्यापार आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार, तसेच एकमेकांचा सन्मान राखून आणि समतोल पद्धतीने होणे अपेक्षित आहे. त्यामुळे या नियमांमध्ये बाधा येऊ दिली जाणार नाही, असे डेल्फिन यांनी चीनचा नामोल्लेख टाळून स्पष्ट केले. चीन प्रशांत भारतीय क्षेत्रात स्वत:चे एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे, असा आरोप बऱ्याच काळापासून आहे.
केवळ आर्थिक संस्था नाही…
युरोपियन महासंघ ही केवळ आर्थिक संस्था नाही. ती एक राजकीय संस्थाही आहे. त्यामुळे जगात ज्या राजकीय किंवा सामरिक घडामोडी घडत आहेत, त्यांच्यावरही आमचे लक्ष आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात आम्ही साकारलेली भूमिका याचे प्रमाण आहे, असेही डेल्फिन यांनी वक्तव्यात स्पष्ट केले.









