निर्बंध, व्यापार स्थगित करण्याचा विचार सुरू
वृत्तसंस्था/ स्ट्रासबर्ग
युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी इस्रायलसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इस्रायलवर निर्बंध लादणे आणि व्यापार आंशिक स्वरुपात रोखण्याचे पाऊल उचलण्याबद्दल विचार सुरू आहे. पुढील महिन्यात एक ‘पॅलेस्टिनी देणगीदार समूह’ निर्माण केला जाणार असून याचा एक हिस्सा गाझाच्या भविष्यातील पुनउ&भारणीवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मानवनिर्मित दुष्काळ कधीच युद्धाचे अस्त्र असू नये. मुले आणि मानवतेसाठी याला रोखणे आवश्यक असल्याची टिप्पणी वॉन डेर लेयेन यांनी फ्रान्सच्या स्ट्रासबर्गध्ये युरोपीय संसदेच्या बैठकीत केली आहे. इस्रायलने गाझा शहरातील रहिवाशांना शहर पूर्ण रिकामी करण्याचा इशारा दिला असताना युरोपीय महासंघाने ही भूमिका घेतली आहे. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये हल्ले करत 1200 जणांची क्रूरपणे हत्या केली होती. तसेच 251 जणांचे अपहरण केले होते. गाझामध्ये हमासच्या ताब्यात अद्याप 48 ओली असून यातील सुमारे 20 जण जिवंत असण्याची शक्यता आहे.
यानंतर इस्रायलने केलेल्या प्रत्युत्तरादाखलच्या कारवाईत गाझामध्ये कमीतकमी 64 हजार पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार मृतांमध्ये जवळपास निम्मे प्रमाण महिला आणि मुलांचे आहे. गाझामधील प्रमुख शहरांचे मोठे हिस्से पूर्णपणे नष्ट झाले असून 20 लाख पॅलेस्टिनींपैकी 90 टक्के विस्थापित झाले आहेत.









