निवडणूक आयोगाने केले होते निमंत्रित
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती निवडणूक होणार आहे. श्रीलंकेतील या निवडणुकीवर देखरेख ठेवण्यासाठी विदेशातून निरीक्षक कोलंबोत पोहोचले आहेत. युरोपीय महासंघ आणि राष्ट्रकुल देशांच्या निवडणूक पर्यवेक्षकांचा एक समूह श्रीलंकेत दाखल झाला आहे.
पर्यवेक्षकांचा हा समूह श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावर तेथे पोहोचला आहे. युरोपीय महासंघाने यापूर्वी श्रीलंकेत 6 वेळा निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवली आहे. यात अखेरची 2019 च्या राष्ट्रपती निवडणुकही या पर्यवेक्षकांच्या देखरेखीत पार पडली होती.
यंदा श्रीलंकेत निवडणूक देखरेख मोहिमेची तैनाती देशात एक विश्वसनीय, पारदर्शक, समावेशक आणि शांततापूर्ण निवडणुकांचे समर्थन करण्याच्या आमच्या दीर्घकालीन प्रतिबद्धतेची पुष्टी देते असे या निरीक्षकांच्या समुहाच्या प्रमुखाने म्हटले आहे.
लोकशाहीला नवे बळ मिळणार
आगामी अध्यक्षीय निवडणूक ही 2022 मधील राजकीय आणि आर्थिक संकटानंतर लोकशाहीला नवे बळ पुरविणार आहे. ही निवडणूक श्रीलंकेसाठी लोकशाही मूल्यांचा पूर्ण सन्मान करत सुधारणा आणि स्थायी सुधाराच्या स्वत:च्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक तज्ञांचे पथक
एक उपमुख्य पर्यवेक्षक आणि 9 निवडणूक तज्ञांचे मुख्य पथक यापूर्वीच कोलंबोत दाखल झाले आहे. तर 26 दीर्घकालीन पर्यवेक्षक मोहिमेत सामील होतील आणि निवडणूक अभियानावर नजर ठेवण्यासाठी पूर्ण देशात तैनात केले जातील. यानंतर आणखी 32 निरीक्षक निवडणुकीच्या काळात मिशनसोबत जोडले जातील आणि पूर्ण देशात तैनात होतील.









