भारतानंतर ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, इटलीने सेवा केली स्थगित
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतानंतर अनेक युरोपीय देशांनी अमेरिकेला जाणारी टपाल सेवा स्थगित केली आहे. यामध्ये भारत, इटली, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांचा समावेश आहे. सेवा स्थगित करण्याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन टॅरिफ नियम हेच आहे. नवीन नियमांबद्दल अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नसल्यामुळे टपाल विभागाने वस्तू पाठवण्याच्या सेवा सध्या बंद केल्याचे युरोपीय टपाल संघटना पोस्ट युरोप आणि इतर टपाल विभागांनी स्पष्ट केले आहे.
सुरुवातीला भारताने अमेरिकेची टॅरिफ लागू करण्याची आणि गोळा करण्याची प्रक्रिया स्पष्ट नसल्यामुळे अमेरिकेची टपाल सेवा तात्पुरती बंद केली. भारताने दोन दिवसांपूर्वीपासूनच अमेरिकेला जाणारे बहुतेक टपाल वस्तूंचे बुकिंग थांबवले आहे. सध्या हा निर्णय तात्पुरता लागू केला आहे. 23 ऑगस्ट रोजी टपाल विभागाने एक प्रेस नोट जारी करून याबाबतची माहिती दिली होती. तसेच इटलीच्या टपाल विभागाने 23 ऑगस्टपासून ही सेवा बंद केली आहे. तथापि, येथून सामान्य पत्रे पाठवता येतील. दुसरीकडे, ब्रिटनच्या रॉयल मेल सेवेने अमेरिकेला पाठवले जाणारे सर्व पॅकेजेस बंद केले आहेत. याशिवाय, 100 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंवर 10 टक्के शुल्क देखील आकारले जाईल. टॅरिफ कलेक्शन सिस्टममध्ये स्पष्टता नसल्याने फ्रान्स आणि नेदरलँड्सनेही आता टपाल सेवेवर निर्बंध लागू केले आहेत.









