मुक्त व्यापार करार करण्याची संघटनेची तयारी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
युरोपियन महासंघ आयोगाच्या प्रमुख उर्सेला व्हॉन डर लेयेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी महत्वाची चर्चा केली आहे. रशियाने युक्रेनशी युद्ध थांबवावे, यासाठी भारताला महत्वाची भूमिका साकारायची आहे, असे आवाहन त्यांनी या चर्चेत केले. तसेच महासंघ भारताशी भागिदारी अधिक बळकट करण्यास उत्सुक आहे. भारताशी आम्हाला मुक्त व्यापार करार करायचा आहे, अशी इच्छाही त्यांनी या चर्चेत व्यक्त केल्याची माहिती त्यांनी स्वत: ‘एक्स’वर दिली आहे. दोन्ही नेत्यांची ही चर्चा दूरध्वनीवरुन झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर 50 टक्के व्यापारी शुल्क लावले आहे. या पार्श्वभूमीवर लेयेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला होता. भारत रशियाचा मित्र देश असल्याने भारताने हे युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी महासंघाची इच्छा असल्याचे त्यांनी या चर्चेत स्पष्ट केले, असे समजते.
भारताची प्रशंसा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संपर्क ठेवला आहे. ही बाब युरोपियन महासंघाच्या नेत्यांना आनंदित करणारी आहे. रशिया आणि युव्रेन यांच्यात लवकरात लवकर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ही चर्चा झाली, तरच काही तोडगा निघू शकतो. हे युद्ध थांबणे जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे, अशीही मांडणी त्यांनी केल्याचे समजते.









