वृत्तसंस्था/ कोलकत्ता
रविवारी येथे झालेल्या नवव्या टाटास्टील पुरस्कृत विश्व 25 कि.मी. पल्ल्याच्या पहिल्या विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोडरेसमध्ये इथोपीयाच्या सुटुमी केबेडाने महिला विभागातील तर युगांडाच्या स्टिफन किसाने पुरुष विभागातील विजेतेपद पटकाविले.
इथिओपियाच्या केबेडाने मात्र या रोडरेसमधील महिलांच्या विभागातील जेतेपद पुन्हा आपल्याकडे राखले. दरम्यान पुरुषांच्या विभागात युगांडाच्या स्टिफन किसाने विद्यमान विजेत्या केनियाच्या इबेनोव्हला मागे टाकत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने नवा स्पर्धा विक्रम केला. भारताच्या संजीवनीने महिलांच्या विभागातील जेतेपद पटकाविले. सदर रोडरेस विविध वयोगटात घेण्यात आली होती.
इथिओपियाच्या केबेडीने महिलांच्या विभागातील जेतेपद मिळविताना 1 तास 19 मिनिटे आणि 17 सेकंदाचा अवधी नोंदविला. केनियाच्या चिपेनगेनोने तिसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या विभागात युगांडाच्या स्टिफन किसाने केनियाच्या विद्यमान विजेत्या डॅनियल इबेनोव्हला मागे टाकत जेतेपद मिळविताना 1 तास 12 मिनिटे आणि 33 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान पटकविले. किसाला या जेतेपदाबरोबरच 15 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. केनियाच्या इबीनोने दुसरे स्थान तर अॅन्थोनी किपचिरचीरने तिसरे स्थान घेतले.
या रोडरेसमध्ये भारतीय स्पर्धकांच्या विभागात 26 वर्षीय गुलवीर सिंगने 1 तास 14 मिनिटे आणि 10 सेकंदाचा अवधी घेत पहिले स्थान, सावनने दुसरे स्थान आणि गौरव माथुरने तिसरे स्थान पटकाविले. महिलांच्या विभागात संजीवनी जाधवने विजेतेपद मिळविले असून कविता यादवने दुसरे स्थान तर लिली दासने तिसरे स्थान घेतले.









