अध्याय एकोणीसावा
भीष्माचार्यांनी धर्मराजाला केलेल्या उपदेशाचे सार भगवंत उद्धवाला सांगत आहेत. जेणेकरून त्यातून योग्य तो बोध घेऊन, विषयसुखाला भुललेले दिनजन स्वतःचा उद्धार करून घेतील. भगवंत उद्धवाला म्हणाले, प्राणिमात्रामध्ये चैतन्य हे समसमान असल्यामुळे सर्वांचा आत्मा एकच आहे, असे समजणे हेच ज्ञान होय. व्यापक अशा परब्रह्माने देहादिक सारी तत्त्वे व्यापलेली आहेत, असे अगदी जीवाभावाने निश्चितपणे समजणे हे विज्ञान होय. नाशवंत व साकार यांचे निरूपण आता सांगतो. त्रिगुणात्मक म्हणून जेवढे आहे, तेवढे सारे नाशवंतच आहे. जर नाशवंत नसते, तर सगुण सत्य आहे असेच मानले असते. जेथे तीन गुण आहेत तेथे उत्पत्ती, स्थिती व लय आहे. रजोगुणाने उत्पत्ती, सत्त्वगुणाने स्थिती आणि तमोगुणाने नाश होतो. हा गुणांच्या वृत्तीचा स्वभावच आहे. या गुणांमध्ये परब्रह्म असतेच. त्याच्याच योगाने गुणांचे कार्य प्रकाशित होते परंतु ती वस्तु जन्ममरणादि दोषांपासून अलिप्त असते व अविनाशीच राहते. जी वस्तु तिन्ही गुणांना आश्रयभूत असते, जिच्या योगानेच गुणांची कर्मे चालतात, ती तीन गुणांहून अगदी निराळी आहे. अशा प्रकारे जे परमात्मतत्त्व सुरूवातीला आणि शेवटी असते, तेच एका कार्यातून दुसऱया कार्यात सूत्राने गुंफलेले असते आणि प्रलयकाळी उत्पन्न झालेले सर्व आपल्यामध्ये विलीन करून घेतल्यावर शेवटी जे शिल्लक राहते, तेच ‘सत्’ तत्त्व होय. गुणांच्या आधी, मध्ये व अंती, तसेच सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती व लयाच्या वेळी जे अविनाशरूपाने राहते, तेच ‘संत’ म्हणजे शाश्वत तत्त्व आहे असे मी समजतो.
ते ‘संतत्व’ असे की, ज्याच्या आधाराने जग रहात आहे, आणि जे जगाच्या अंतर्बाह्य भरलेले आहे आणि ज्याच्या योगेकरून जग प्रकाशित होते. हे जग उत्पन्न होते आणि लयास जाते पण ते तत्त्व कायमच असते. अशी जी आत्मवस्तु आहे, तीच सत्य आहे असे तू समज. ज्याप्रमाणे घट आणि मठ होतात आणि जातात, पण आकाश असते तसेच असते त्याचप्रमाणे ब्रह्मांडाची उत्पत्ती व लय झाला तरी, परब्रह्म असते तसेच साठलेले असते. अलंकार करण्यापूर्वी असलेले सोने, अलंकार केले तरी त्यात सोनेपणानेच असते किंवा अलंकार मोडले तरी सोने असते त्याप्रमाणेच असते. त्याचा त्या अलंकाराबरोबर जसा नाश होत नाही त्याप्रमाणे चराचराला व्यापून परब्रह्म हे अखंडाकारच असते. कोणताही आकार किंवा विकार उत्पन्न झाला किंवा मोडला तरी त्या परब्रह्माला अणुमात्र विकार होत नाही. अशा प्रकारची अखंडपणाने राहणारी जी परब्रह्मरूप वस्तु आहे. तिला चार प्रमाणे आहेत. त्या प्रमाणांवरून ती वस्तु जाणावी आणि प्रपंच हा मिथ्या आहे असे समजावे.
वेद, प्रत्यक्ष, इतिहास आणि अनुमान या चारही प्रमाणांनी भेदबुद्धीचे अस्तित्व सिद्ध होत नाही म्हणून विवेकी पुरूष भेदबुद्धीचा त्याग करतो. जिकडे तिकडे सारे एक अद्वैत परब्रह्मच आहे. दुसरे आणखी काही एक नाही. त्या परब्रह्मामध्ये हा प्रपंच मिथ्या भासाचा आहे. याला वेदवाक्मय प्रमाण आहे.
देहादिकांची क्षणभंगुरता आपण प्रत्यक्ष पाहतोच. प्रपंचाच्या क्षणिकत्वाचे हे दुसरे ‘प्रत्यक्ष प्रमाण’ होय. मार्कंडेय आणि भृशुंडी यांनी कोटय़वधी कल्पातांच्या वेळी प्रपंचाची राखरांगोळी झालेली डोळय़ांनी पाहिली आहे असे मोठमोठय़ांच्या मुखातून आपण अनेक वेळा ऐकलेले आहे हे प्रपंचाच्या नश्वरपणाचे तिसरे ‘ऐतिहासिक प्रमाण’ होय.
शास्त्रप्रसिद्धीवरून आणि अनुमानानेही प्रपंचाचा भास मिथ्याच आहे. तो मृगजळासारखा दिसतो. त्यांत खरेपणा नाही. दोर खरोखर दोराच्याच रूपाने असतो परंतु भ्रमाने तो अनेक आकाराचा दिसतो. हे काय लाकूड आहे का साप ? की मोत्यांचा सर? की ही पाण्याची धार पडलेली आहे ? काहीच समजत नाही.
तद्वत् परब्रह्म हे एक असून चैतन्यधन आहे. त्याबद्दल भ्रमाने अनेक प्रकारच्या मतांचे वाद माजून राहतात. कोणी शून्य म्हणतात, कोणी सगुण म्हणतात की कोणी आणखीन काही पण त्याला कोणताही आधार नसतो.
क्रमशः







