सहकार मंत्री के. एन. राजन्ना : आमदार लक्ष्मण सवदींच्या नेतृत्त्वाखाली समिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
सहकारी संस्था, सहकारी बँका आणि संस्थांमध्ये होणारे गैरप्रकार रोखून दोषींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत आवश्यक सल्ला देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी दिली. विकाससौध येथे 70 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री राजन्ना पुढे म्हणाले, सहकारी बँका आणि संघटनांच्या सभासद आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सहकारी संस्थांमधील गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करून दोषींना अधिक शिक्षा व्हावी यासाठी आम्ही आमदार लक्ष्मण सवदी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत आमदार जी. टी. देवेगौडा, षडाक्षरी, माजी मंत्री एस. आर. पाटील, राजेंद्रकुमार यांच्यासारखे ज्येष्ठ सहकारी असून या समितीच्या अहवालाच्या आधारे आम्ही पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात 45 हजारांहून अधिक सहकारी संस्था आहेत. बहुतेक सर्व संस्था चांगल्या पद्धतीने चालत आहेत. मात्र, काही ठिकाणी गैरव्यवहार झाले आहेत. या समितीच्या अहवालामुळे याला आळा घालण्यास आणि व्यवसाय करणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यास मदत होईल. कोणत्याही सहकारी संस्था, बँकांमध्ये ठेवीदार आणि शेतकऱ्यांना अन्यायकारक वागणूक देऊ नये, यासाठी आम्ही कठोर उपाययोजना हाती घेणार आहे, असे मंत्री राजन्ना म्हणाले.
केंद्राच्या डिजिटायझेशनचे स्वागत
डिजिटायझेशनमुळे सहकारी संस्थांमधील गैरव्यवहार आणि बोगस कागदपत्रे टाळण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारने सहकारी संस्थांच्या डिजिटायझेशनची योजना यापूर्वीच तयार केली आहे. याचे आम्ही स्वागत करतो. आम्ही सर्व लँड बँक आणि सहकार विभाग डिजीटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सहकारी संस्थांमधील गैरव्यवहार थांबणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबरमध्ये सहकार सप्ताह
दरवषीप्रमाणे यंदाही सहकार सप्ताह साजरा केला जाणार आहे. 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत 70 वा अखिल भारतीय सहकार सप्ताह होणार आहे. सहकार सप्ताहाच्या 7 दिवसात विविध विषयांवर चर्चा केली जाते. राज्यातील सर्व जिल्हा व तालुका सहकारी संस्थांमध्ये हा सहकार सप्ताह होणार आहे, असे कर्नाटक राज्य सहकारी महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार जी. टी. देवेगौडा यांनी यावेळी सांगितले.









