‘सीपीआर’मधील नर्सिंग कॉलेजची 1954 मध्ये स्थापना; तत्कालीन गरजेनुसार 20 विद्यार्थी क्षमता, नर्सिंग कॉलेजला 50 जागांची गरज
कृष्णात पुरेकर : कोल्हापूर
सीपीआर जिल्हय़ाची आरोग्यदायिनी…या हॉस्पिटलमध्ये 1954 मध्ये नर्सिंग स्कूल, कॉलेजची स्थापना झाली. पण तेव्हापासून आजपर्यत 65 वर्षांनंतरही नर्सिंग अभ्यासक्रमासाठी 20 जागांचीच क्षमता आहे. जिल्हय़ा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले, महाविद्यालयाने नर्सिंगच्या 100 जागांसाठी प्रस्ताव दिला आहे, पण तोही रेंगाळला आहे. परिणामी 65 वर्षांनंतरही नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागा तेवढय़ाच राहिल्याने आरोग्यसेवेवर मर्यादा आल्या आहेत.
सीपीआर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे असल्यापासून येथे नर्सिंग स्कुल होते. तेथे 20 जागांची क्षमता होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर ते नर्सिंग कॉलेज झाले. त्याचे व्यवस्थापन सीपीआरसमवेतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेले. सीपीआर हॉस्पिटल साडेसहाशे बेडचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे 1100 बेडचे हॉस्पिटल शेंडा पार्क येथे प्रस्तावित आहे. हॉस्पिटलसोबतच नर्सिंग कॉलेजही प्रस्तावित आहे. नर्सिंग कॉलेजसाठी 100 विद्यार्थी संख्येचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवला आहे.
सीपीआर हॉस्पिटल सुरू झाले, तेव्हाच येथे नर्सिंग स्कूलही सुरू झाले. नर्सिंग स्कूलची स्थापना 1954 ची आहे. तत्कालीन लोकसंख्येला धरून परिचारिका अभ्यासक्रमांसाठी 20 जागांची क्षमता सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केली. साडेसहाशे बेडच्या सीपीआरसाठी ती योग्यच होती. कालांतराने येथे परिचारिकांसाठी ए.एन.एम. आणि जी.एन.एम. अभ्यासक्रम सुरू झाला. दोन आणि तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. एएनएम परिचारिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवेची संधी मिळते. जीएनएम परिचारिकांना कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सेवा करता येते. त्यासाठी सध्या बारावी सायन्स ही शैक्षणिक पात्रता आहे.
बेसीक बी.एस्सी.च्या अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा
राज्यात सध्या मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथील नर्सिंग कॉलेजमध्ये 40 विद्यार्थ्यांना प्रवेशाची मंजुरी मिळाली आहे. पण कोल्हापूरने वारंवार प्रस्ताव देऊनही त्याकडे आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. आता या चारही नर्सिंग कॉलेजमध्ये बेसिक बी.एस्सी.चे अभ्यासक्रम सुरू आहेत. बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. त्याचाही प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला आहे. पण तोही लालफितीत अडकला आहे.
बेसीक बी.एस्सी. अभ्यासक्रम प्रस्ताव सचिवालय पातळीवर..
वाढीव विद्यार्थी क्षमतेला मर्यादा आली आहे. एएनएम आणि जीएनएमसाठी 50 जागांचा प्रस्ताव दिला आहे. तसेच बेसिक बी.एस्सी.साठी 50 जागांचा प्रस्ताव सचिवालय स्तरावर आहे. नर्सिंग कॉलेजची इमारत पूर्ण होताच याला मान्यता मिळेल.
डॉ. प्रदीप दीक्षित, अधिष्ठाता राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.