केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रतिपादन : मत्तीकोप्प येथे वसतिगृहाचे भूमिपूजन
प्रतिनिधी /बेळगाव
शेतकऱयांच्या हितासाठी केएलई संस्थेने कृषीविज्ञान केंद्राची स्थापना केली आहे. परिसरातील शेती व समाज विकासात संस्थेचे योगदान मोठे आहे. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या प्रयत्नामुळे देशातील एक उत्कृष्ट कृषीविज्ञान केंद्र ग्रामीण भागात उभे आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी काढले.
मत्तीकोप्प, ता. बैलहोंगल येथील केएलई संस्थेच्या कृषीविज्ञान केंद्राच्या आवारात शेतकरी व कर्मचाऱयांच्या वसतिगृहाचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी झाला. केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार सर्वच क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात डॉ. प्रभाकर कोरे व केएलई संस्थेचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, कृषीविज्ञान केंद्रात प्रशिक्षणासाठी येणाऱया शेतकऱयांसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहे. डोंगर सपाटीकरण करून सुपीक जमीन तयार करण्यात आली आहे. या परिसरातील शेतकऱयांची पिके परदेशात जातील, अशा दर्जाची पिके घेण्यात येत आहेत. वैज्ञानिकपणे सोयाबीन आणि भुईमूग शेंगांचे उत्पादन घेऊन खाद्यतेल उत्पादन करण्यात येत आहे. 350 टन बियाणे मध्यप्रदेशला पाठविण्यात आले आहे. या परिसरात पिकविलेला भाजीपाला नासू नये, यासाठी शीतगृहाची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावेळी आमदार महांतेश दोड्डगौडर, आयसीएआरचे संचालक डॉ. व्ही. वेंकटसुब्रमण्य, बी. आर. पाटील, प्राचार्या श्रीदेवी अंगडी आदी उपस्थित होते. मत्तीकोप्प येथील कृषीविज्ञान केंद्राच्या आवारात शेतकऱयांसाठीही वसतिगृह उभारण्यात येत आहे.









