अतिवृष्टीबाबत महापालिकेने घेतली दक्षता
बेळगाव : शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. याचबरोबर महानगरपालिकेनेही तातडीने दखल घेतली असून शहरातील दक्षिण व उत्तर विभागात 10 निवारा केंद्रांची स्थापना केली आहे. त्याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करण्याबाबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सूचना केल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. वडगाव, गांधीनगर, महांतेशनगर यासह इतर परिसरात पाणी साचून राहिले असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्या कुटुंबांना आवश्यकता भासल्यास हलविण्याबाबत विचार करण्यात येणार आहे. अधिक पाऊस झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये तत्काळ आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याची सूचना वॉर्डातील शाखा अधिकारी, महसूल निरीक्षक, आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सध्या त्यांना ब्लँकेट तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढे कोणतीही अडचण आल्यास त्याही सर्व वस्तू उपलब्ध करण्याबाबत सूचना केली आहे. बेळगाव दक्षिण व उत्तर विभागात एकूण 10 निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्याठिकाणी एक महसूल निरीक्षक, एक द्वितीय साहाय्यक दर्जा अधिकारी यांच्यासह सहा जणांची नियुक्ती केली आहे. याचबरोबर ज्यांना मदत हवी आहे, त्यांनी त्या अधिकाऱ्यांच्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









