महापालिकेला निवेदन : मानव अधिकार-भ्रष्टाचारविरोधी फोरमच्या कार्यकर्त्यांची मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य महानगरपालिका कायद्यानुसार प्रत्येक वॉर्डामध्ये स्थानिक लोकांची वॉर्ड कमिटी स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे महानगरपालिकेचे अधिकारी आणि महापौरदेखील दुर्लक्ष करत आहेत. तातडीने वॉर्डाची कमिटी स्थापन करावी, अशी मागणी मानव अधिकार आणि भ्रष्टाचारविरोधी फोरमच्यावतीने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आपल्या वॉर्डातील समस्या मांडण्यासाठी या वॉर्ड कमिटीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊन दोन वर्षे उलटली. मात्र, वॉर्ड कमिटी करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. तेव्हा समस्या सोडविण्यासाठी तसेच स्थानिक समस्या मांडण्यासाठी या कमिटीची गरज असून ती तातडीने नियुक्त करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष महांतेश हुलीकट्टी, प्रमोद गुंजीकर, सदानंद जाधव, करण मुचंडी, सुशील एस. बी., अनिल चौगुले, अक्षय कुलकर्णी, प्रेम चौगुले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









