मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे देवस्थान समित्यांना आवाहन
पणजी : राज्यातील मंदिरे ही शांततेची प्रतिकेची आहेत. गावागावात शांतता राखण्यात मंदिरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे मंदिरांचे पावित्र्य जपण्याबरोबरच गावात एकोपा, शांती टिकविण्याबरोबरच समाजाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक घडी बसवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. रविवारी 9 फेब्रुवारीला राज्यभरातील देवस्थान समित्यांच्या झालेल्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मंदिरे ही आपली प्रमुख ओळख आहे. त्यामुळे नूतन देवस्थान समित्यांनी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पर्यटन वाढीसाठी हातभार लावावा, असे ट्वीटच्या माध्यमाद्वारे जनतेला सांगितले. देवस्थानचे व्यवस्थापन तसेच दैनंदिन कामकाज सांभाळण्याचे कार्य देवस्थान समित्यांचे आहे. देवस्थानच्या योग्य व्यवस्थापनाबरोबर भाविकांना योग्य त्या सुविधा पुरवणे गरजेचे आहे. समाजात आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक एकोपा टिकवून ठेवण्यातसुद्धा देवस्थान समित्यांना महत्वाची भूमिका वठवावी लागणार आहे. सांस्कृतिक केंद्र म्हणून देवस्थानाची प्रतिमा तयार व्हावी. आपल्या मंदिरांचा समृद्ध वारसा पर्यटकांपर्यंत पोचविण्याचे काम देवस्थान समित्यांनी करायला हवे, यासाठी आध्यात्मिक पर्यटनास चालना द्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.









