निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांची विधानसभेत मागणी : आमदार राजू कागे यांनीही मांडल्या समस्या
बेळगाव : उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर मंगळवारीही विधानसभेत चर्चा झाली. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना चर्चेची संधी दिली. त्यामुळे नवनिर्वाचित आमदारांनी सभाध्यक्षांचे आभार मानले. बुधवारीही ही चर्चा सुरू राहणार असून त्यानंतर या चर्चेला सरकार उत्तर देणार आहे. निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी उत्तर कर्नाटकाच्या विकासात पक्षपातीपणा होत आहे. बेंगळूर, म्हैसूरच्या तुलनेत आपला भाग विकसित झाला नाही, हे सांगतानाच निपाणी भागातील शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकला. शाळाखोल्या नाहीत, मुलांना बसायला जागा नसल्यामुळे झाडाखाली वर्ग भरविले जातात. सरकारी हायस्कूल व पीयू कॉलेजची संख्या कमी आहे. उत्तम शिक्षण मिळाले तरच कित्तूर कर्नाटकाचा विकास होणार आहे.
निपाणी परिसरातील मुले कॉलेजसाठी महाराष्ट्रात जातात. त्यांचा रहिवासी दाखला कर्नाटकातला असतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रहिवासी कर्नाटकाचा, शिक्षण महाराष्ट्रात, त्यामुळे दोन्ही राज्यात त्यांना स्थान मिळत नाही. आरोग्य क्षेत्रातही सुविधा नाहीत. पशुवैद्यकीय केंद्रांची कमतरता आहे. पाणी-वीज शेतीसाठी महत्त्वाचे आहेत. कल्याण कर्नाटक विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कित्तूर कर्नाटक विकास प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी शशिकला जोल्ले यांनी केली. कारदगा येथे दूधगंगा नदीवर पूल उभारण्यात आला आहे. पंधरा कोटी रुपये खर्चून त्याची उंची वाढविण्यात आली आहे. उर्वरित कामे लवकर पूर्ण करावीत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अपुऱ्या बस सुविधांचा फटका बसत आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधतानाच त्यांनी पुन्हा चिकोडी जिल्ह्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, बसवराज शिवण्णावर, जे. टी. पाटील, बी. आर. पाटील, महेश टेंगिनकाई, डॉ. अविनाश जाधव, आदींनीही उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यावर चर्चेत सहभाग घेतला.
कागवाडचे आमदार राजू कागे यांनी कृष्णा काठावरील पूरग्रस्तांच्या व्यथा मांडल्या. गेल्या 20 वर्षांपासून कृष्णा काठावरील गावांना पुराचा फटका बसतो. जुगुळ, मंगावती, शापूर भागाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. त्यावेळी या गावांनी स्थलांतरासंबंधी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी स्थलांतराचे आश्वासन दिले आहे. प्राधान्याने हे काम व्हावे. पूरग्रस्त भागातील रस्त्यांची उंची वाढवावी. याबरोबरच विजेची समस्या गंभीर आहे. किमान दहा ते बारा तास थ्री फेज वीज दिली तरच शेतकरी जगणार आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधत कृष्णा काठावरील शेतकऱ्यांची थकित वीजबिले माफ करण्याची मागणी त्यांनी केली. कागवाड तालुक्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अद्याप अनेक कार्यालये सुरू करायला पाहिजे, अशी मागणी करतानाच महाराष्ट्राच्या सीमेला लागूनच कागवाड तालुका येतो. शिक्षण, आरोग्य क्षेत्रात हा तालुका मागास आहे. सरकारी दवाखाने आहेत, मात्र त्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत, याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
कागेंकडून क्षारपड जमिनींचा मुद्दा उपस्थित
राजू कागे यांनी चिकोडी, अथणी, कागवाड, जमखंडी, बागलकोट जिल्ह्यांतील क्षारपड जमिनींचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. क्षारामुळे जमिनी पडीक बनल्या आहेत. या जमिनी सुधारण्यासाठी पाईप घातला जातो. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. यंदा आपल्या मतदारसंघात 5 कोटी रुपये दिले आहेत. एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. सरकारने अनुदान दिले तरच ही गंभीर समस्या संपवता येणार आहे, असे सांगतानाच सहकारी कारखाने अडचणीत आहेत. खासगी कारखाने मात्र फायद्यात आहेत, याकडे लक्ष वेधत महाराष्ट्राप्रमाणे तोट्यातील सहकारी साखर कारखान्यांना 100 ते 200 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली.
महामानवाच्या निपाणी भेटीचेही स्मरण करावे
महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शतकमहोत्सव थाटात साजरा केला जात आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चिकोडी न्यायालयात आले होते. त्यावेळी दोन दिवस निपाणी येथील वराळे यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. 26 डिसेंबरला बाबासाहेबांच्या भेटीलाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारने महामानवाच्या निपाणी भेटीचेही स्मरण करण्याची मागणी आमदार शशिकला जोल्ले यांनी केली.









