जैन समाजाची पत्रकार परिषदेत मागणी : कागवाड येथे होणार महासंमेलन
बेळगाव : राज्यातील छोट्या समाजांचा विकास व्हावा, यासाठी महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. परंतु अद्याप सरकारने जैन महामंडळ स्थापण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जैन समाजाचे राज्य आणि देशासाठी मोठे योगदान आहे. तथापि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जैन महामंडळ स्थापन करावे, अन्यथा जैन समाजालाही आंदोलन करण्याची वेळ येईल, असा इशारा माजी आमदार संजय पाटील यांनी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला. जैन समाज नेहमीच अहिंसेच्या मार्गाने मार्गक्रमण करीत आहे. परंतु सरकार जैन समुदायाकडे दुर्लक्ष करीत आहे. जैन मंदिराचे संरक्षण, त्यांचा जीर्णोद्धार, नवीन जैन बस्ती उभारणी, वसतिगृह बांधकामासाठी, स्वतंत्र महामंडळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे जैन समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र जैन महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
जैन समाजाचे कागवाड येथे महासंमेलन
जैन समाजाचे तिसरे महासंमेलन 6 ते 8 जून दरम्यान कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे होणार आहे. या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक संत महात्मे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत कार्यक्रमाला हजेरी लावतील. आचार्य श्री 108 गुणधरनंदी मुनीमहाराज यांच्या सान्निध्यात जैन संमेलन होणार असून मोठ्या संख्येने जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेवेळी अॅड. संजय कुचनूरे, चारुकीर्ती सैबण्णावर, राजेंद्र जकन्नावर यासह इतर उपस्थित होते.









