25 वर्षानंतर स्वप्नपूर्ती, प्रतीक्षा संपणार;
वर्षअखेरीपर्यंत 100 बेडचे हॉस्पिटल पूर्णत्वास
कोल्हापूर /संतोष पाटील
नागाळा पार्क येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) हॉस्पिटलची एम्स्च्या धर्तीवर वर्षअखेरपर्यंत सेवेत दाखल होत आहे. 100 बेड आणि सहा मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि दहा विभागीय दवाखान्यांसाठी तब्बल 110 कोटी रुपयांचा निधीची तरतूद झाली आहे. सध्या 30 बेडची असणारी ही आरोग्य सेवा डिसेंबर2023 अखेर पूर्णक्षमतेने कार्यान्वित होत आहे. ईएसआयसीचा लाभ कोल्हापुरातील तब्बल दीड कामगारांच्या पाच लाख कुटुंबियांना होणार आहे. आस्थापनातील 20 कर्मचाऱ्यांची अट 10 इतकी झाल्याने जिह्यातील सुमारे 10 लाखांहून अधिक कामगार कुटुंबिय ईएसआयसीच्या सेवाक्षेत्रात येतील.
पुण्याच्या धर्तीवर कोल्हापुरातही सर्वसामान्य विमाधारकांना त्यांच्या हक्काची आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, या उद्देशाने नागाळा पार्क येथील शासकीय विश्रामगृहामागे असलेल्या सुमारे आठ एकर जागेत 150 बेडच्या ‘ईएसआयसी‘च्या सुसज्ज हॉस्पिटलची पायाभरणी 25 वर्षांपूर्वी झाली. नागाळा पार्क येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी) हॉस्पिटलची पायाभरणी झाली. इमारत नऊ कोटी 50 लाखांचा खर्च आणि दहा वर्षे बांधकामानंतर इमारती उभी राहिली. मात्र, 2018 पर्यंत आरोग्य सेवेलाच पंगूपण आले होते. कोल्हापूर-सांगली-सातारासह परिसरातील सुमारे पाच लाख विमाधारकांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून हक्काची आरोग्य सेवा मिळेल, अशी ग्वाही उद्घाटनावेळी लोकप्रतिनिधींनी दिली. अद्ययावत सुविधा तर लांबच, पण साधी सलाईन लावण्याची किंवा साधे इंजेक्शन देण्याची सुविधा देखील लोकप्रतिनिधींना या ठिकाणी पुरविता आली नाही. राजकीय उदासीनताच हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास मारक ठरली.
खासदार संजय मंडलिक यांनी ईएसआयसी हॉस्पिटलसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. 2019 रोजी ओपीडी सुरू झाली आणि एक डॉक्टरपासून सुरू झालेली सेवा आता 22 डॉक्टर आणि 30 बेडपर्यंत पोहोचली. येथे पायाभूत सुविधांसह वैद्यकीय उपकरणांसाठी 70 कोटी तसेच चंदगडसह दुर्गम भागात, कागल, शिरोली, यड्राव गोकुळ शिरगाव एमआयडीसी, कोल्हापूर शहर, इचलकरंजीत दोन आदी दहा ठिकाणी दवाखान्यांची उभारणीसाठी सुमारे 40 कोटींची तरतूद आहे. प्रत्येकी पाच डॉक्टर्ससह आतापर्यंत पाच दवाखाने सुरू झाले असल्याची माहिती ईएसआयसीचे समन्वयक विज्ञान मुंडे यांनी सांगितले.
…तरच होईल ‘चिंता से मुक्ती‘
15 वर्षापूर्वी हॉस्पिटलसाठी कोट्यावधीची इमारत बांधली. मात्र, आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली नाही. आता हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास राज्य विमाधारकांना हक्काचे हॉस्पिटल मिळेल. पुणे विभागातील हे दुसऱ्या क्रमांकाचे अद्ययावत हॉस्पिटल ठरणार आहे. ‘कॅशलेस‘ आरोग्य सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने कागदोपत्रांच्या पूर्ततेची कसरत थांबणार आहे. परताव्याच्या पैशांसाठी हेलपाटे देखील मारावे लागणार नाहीत. कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने ‘चिंता से मुक्ती‘ देण्यात ब्रीदवाक्याप्रमाणे विमा महामंडळाला यश येईल.
लाभार्थींची संख्या झाली दुप्पट
कोरोनामुळे ई.एस.आय.सी. स्कीमबद्दल कोल्हापूर विभागात जागरुकता व वाढता लोकसहभाग पाहता सध्या असलेली दीड लाख ही लाभार्थ्यांची संख्या लवकरच दुप्पट होण्याची शक्यता आहे. योजनेमध्ये सहभागी असलेल्या श्रमिकांच्या कुटुंबियांची संख्या ही जवळपास दहा लाखाने वाढेल. 100 बेडच्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये All India Medical science च्या सुचनेनुसार आवश्यक असणाऊया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयीसुविधा बसविणे, ऑापरेशन थिएटर, ट्रामा सेंटर, आयसीयू, पर्यावरणपुरक सर्व उपकरणे बसवणे, सहा अद्यावत ऑपरेशन थिएटर, कर्मचाऱ्यांकरीता निवासी गृह -56 सदनिका, वाटर ट्रिटमेंट प्लांट, सोलर पॅनल आदींसुविधा उपलब्ध होणार आहेत.
कामगार कुटुबियांनी लाभ घ्यावा
राज्य कामागार विमा योजनेचे विस्तारिकरण सुरू आहे. दहापैकी पाच नवीन सेवा दवाखाने औद्योगिक वसाहतीत सुरू केली आहेत. वैद्यकिय दावे व योजनांचा लाभ यासाठी पुणे आणि मुंबईत असणारे क्षेत्रीय कार्यालय कोल्हापुरात आल्याने सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, सातारा जिल्हयाचे केंद्र कोल्हापूर झाले. अत्याधुनिक अशा सर्वसोयीनियुक्त ईएसआयसीच्या सेवेचा लाभ कोल्हापुरात सुमारे दहा लाख कामगार कुटुंबीयांना होईल. – खा. संजय मंडलिक









