स्थलांतर न करण्याचा कामगार खात्याचा नवा आदेश : तीन महिन्यांत पर्यायी जागा शोधावी लागणार
बेळगाव : अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलला पर्यायी जागा मिळत नाही तोवर तात्पुरत्या स्वरुपात आहे तेथेच हॉस्पिटल चालवावे, असा आदेश कामगार मंत्री संतोष लाड यांच्या सचिवांनी बजावला आहे. त्यामुळे बेळगावमधील कामगारांना अशोकनगर येथेच अजून काही दिवस उपचार घेता येणार आहेत. परंतु, अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत पर्यायी जागा शोधावी लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यात तीन ते साडेतीन लाख ईएसआय अंतर्गत कामगार आहेत. कामगारांचे कुटुंबीय असे मिळून 10 लाखांपेक्षा अधिक ईएसआय लाभार्थी आहेत. बेळगावच्या अशोकनगर या ठिकाणी 50 बेडचे हॉस्पिटल होते.
परंतु, इमारत जीर्ण झाल्याने या ठिकाणी नवे हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. हॉस्पिटलला पर्यायी जागा न मिळाल्याने यमनापूर येथील क्लिनिकमध्ये रेफर हॉस्पिटल सुरू करण्याचा आदेश 29 जानेवारीला देण्यात आला होता. परंतु, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनीही तीव्र विरोध केला होता. तसेच बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी कामगार मंत्री संतोष लाड यांना पत्र लिहून कामगारांना होणारी गैरसोय टाळण्याची मागणी केली होती. या सर्वांची दखल घेत यमनापूर येथे स्थलांतरचा आदेश मागे घेण्यात आला. हॉस्पिटलला प्रशस्त जागा उपलब्ध होईपर्यंत अशोकनगर येथेच हॉस्पिटल चालविले जाणार असल्याचा नवा आदेश कामगार आयुक्तांच्या सचिवांनी बजावला आहे.
कंत्राटी कामगारांबाबत अनिश्चितता
ईएसआय हॉस्पिटलचे स्थलांतर यमनापूर येथील क्लिनिकमध्ये करण्याचा आदेश देण्यात आला होता. यावेळी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या 45 हून अधिक कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. परंतु, आता आहे तेथेच हॉस्पिटल सुरू ठेवण्याचा आदेश आला असला तरी कंत्राटी कामगारांबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. सोमवारनंतर याबाबत योग्य निर्णय होईल, अशी माहिती दिली जात आहे.









