ओटीटीवर स्वत:ची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री
उत्तरप्रदेशच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित सीरिज ‘मिर्झापूर’मध्ये माधुरी यादवची भूमिका साकारून चर्चेत आलेली अभिनेत्री ईशा तलवार आता पंजाबच्या संगीतसृष्टीवर आधारित वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. ‘चमक’ ही सीरिज पंजाबच्या संगीतसृष्टीवर प्रकाश पाडणारी आहे. एक कलाकार प्रसिद्धी मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींना सामोरा जातो, यादरम्यान त्याचे कौटुंबिक संबंध कशाप्रकारे प्रभावित होतात यावर याची कहाणी आधारित आहे.

या सीरिजमध्ये एक सामान्य युवतीची भूमिका मी साकारत आहे. ही सीरिज पंजाबी संगीतसृष्टीवर आधारित आहे. ग्लॅमर व्यतिरिक्त एक कलाकाराचा प्रवास अन् प्रसिद्धीचा त्याच्या आयुष्यावर पडणारा प्रभाव या सीरिजमध्ये दर्शविला जाणार आहे असे ईशा तलवारने म्हटले आहे.
मागील महिन्यात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित वेबसीरिज ‘सास बहू और फ्लेमिंगो’मधील ईशाच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. या सीरिजमध्ये ईशाने डिंपल कपाडिया यांच्या सुनेची भूमिका साकारली होती. तर चमक या सीरिजचे दिग्दर्शन रोहित जुगराज चौहान यांनी केले असून ती ऑगस्ट महिन्यात सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.









