रेपो दर सलग तिसऱ्यांदा 6.50 टक्क्यांवर स्थिर : आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण जाहीर
वृत्तसंस्था /मुंबई
रिझर्व्ह बँकेने गुऊवारी रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केला. या आरबीआयने सलग तिसऱ्यांदा दर स्थिर ठेवल्यामुळे व्याजदर 6.50 टक्क्यांवर राहील. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी सकाळी पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. रेपोदर स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न आरबीआयने केला असला तरी चालू आर्थिक वर्षासाठी महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याचवेळी जीडीपी वाढीचा अंदाज 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. या निर्णयांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. आरबीआयकडे रेपो रेटच्या रूपात महागाईशी लढण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. जेव्हा महागाई खूप जास्त असते, तेव्हा आरबीआय रेपो दर वाढवून अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी करण्याचा प्रयत्न करते. रेपो दर वाढल्यास बँकांना आरबीआयकडून मिळणारे कर्ज महाग झाल्यानंतर बँकाही आपल्या ग्राहकांसाठी कर्जे महाग करतात. यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचा प्रवाह कमी होतो. त्याचप्रमाणे, जेव्हा अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात असताना पुनर्प्राप्तीसाठी पैशाचा प्रवाह वाढवणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत आरबीआय रेपो दर कमी करते. त्यामुळे बँकांसाठी आरबीआयचे कर्ज स्वस्त होते आणि ग्राहकांनाही स्वस्त दरात कर्ज मिळते. आता नव्या पतधोरणानुसार रेपो दर स्थिर ठेवण्यात आल्याने कर्जदारांना किंचित दिलासा मिळाला आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत
आरबीआयने आर्थिक वर्ष-24 साठी वास्तविक जीडीपी वाढ 6.5 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. पूर्वीच्या धोरणातही हेच गृहीतक होते. भारत इतर देशांच्या तुलनेत जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यास अधिक सक्षम असल्याचे नमूद करत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचा दावाही दास यांनी केला आहे.
महागाई वाढण्याचे संकेत
चलनवाढीबाबत अजूनही चिंता आणि अनिश्चितता आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किरकोळ आणि घाऊक हे दोन्ही महागाई 4 टक्क्यांच्या वर राहण्याची शक्मयता आहे. महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांवरून वरून 5.4 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. भाज्यांच्या वाढत्या किमतींमुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महागाई वाढण्याची शक्मयता आहे. तसेच मसाल्याचे पदार्थही तेजीत राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत किरकोळ महागाई 5.7 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
500 ऊपयांपर्यंतचे युपीआय पेमेंट ‘पिन’शिवाय होणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय वापरकर्त्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय युपीआय लाईट वापरणाऱ्या लोकांसाठी आहे. आरबीआयने युपीआय लाईट वापरकर्त्यांसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे. आता वापरकर्ते या फीचरद्वारे 500 ऊपयांपर्यंतचे व्यवहार पिनचा वापर न करताही करू शकणार आहेत. तसेच दुसरीकडे, सरकारने लवकरच ऑफलाईन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे. एनसीपीआय आणि आरबीआयद्वारे सप्टेंबर 2022 मध्ये युपीआय लाईट सर्वांसाठी लाँच केले होते. ही युपीआयची अतिशय सोपी आवृत्ती मानली जाते.
कर्ज प्रक्रियेमध्ये सुलभता आणणार
वाढती महागाई आणि जागतिक परिणामांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असून कर्जदारांना फ्लोटिंग व्याजदरातून स्थिर व्याजदराचा पर्याय निवडण्याची मुभा देण्याची तयारी सुरू आहे. हा निकष गृह, वाहन आणि इतर प्रकारच्या कर्जाच्या कर्जदारांना काही प्रमाणात दिलासा देणार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुऊवारी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीनंतर सांगितले. या कर्ज सुलभतेसाठी एक नवीन फ्रेमवर्क तयार करण्यात येत आहे. या अंतर्गत, बँका किंवा आर्थिक संस्थांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना कर्जाचा कालावधी आणि मासिक हप्ता म्हणजेच ईएमआयची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. कर्जाची मुदत किंवा ईएमआयमधील कोणत्याही बदलासाठी कर्जदारांशी स्पष्ट संभाषण करावे लागेल. तसेच कर्जदारांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक परिपूर्ण नियमावली करण्याचा प्रस्ताव आहे. सदर नियमावली पालन सर्व नियामक संस्थांना करावे लागेल, असे दास यांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे परिणाम…
- देशात महागाई नियंत्रणात आणण्याचे काम केले जात आहे. मात्र, अन्नधान्याची चलनवाढ हा अजूनही चिंतेचा विषय आहे. अशा स्थितीत नवीन पतधोरण महागाईवर लक्ष ठेवणार आहे.
- जागतिक आव्हानांचा सामना करताना भारत इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची जीडीपी वाढ 6.5 टक्के राहण्याची अपेक्षा आहे.
- सद्यस्थितीत महागाई आणि प्रतिकूल हवामानामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने उभी राहिली आहेत. टोमॅटोमुळे भाज्यांच्या दरात तेजी आहे. काही महिन्यांनी भाज्यांच्या दरात कपात होण्याची शक्मयता आहे.









